दीपक मोहिते,
विश्लेषण,
उद्धव ठाकरे यांनी समंजस भूमिका घ्यावी,
महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या जागावाटप व मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण ? यावरून घमासान सुरू झाले आहे.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला शरद पवार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ” रुसूबाई रुसू आणि कोपऱ्यात जाऊन बसू,” अशी भूमिका स्विकारली आहे.त्यांचे अशाप्रकारचे वागणं आघाडीला त्रासदायक ठरू शकते.तर दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप याविषयी चकार शब्द काढायला तयार नाही.त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे याविषयी बोलताना,” हा निर्णय पार्लमेंटरी बोर्डात होणार असल्याचे सांगत सुटले आहेत.आणि ते खरं देखील आहे,एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडेल,असे सगळ्यांना वाटले होते.दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस देखील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते.पण अचानक एकनाथ शिंदे बोहोल्यावर चढले.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या तिघांनी घेतला होता.या अशा कटू अनुभवामुळे भाजपचे नेते याविषयी बोलायला तयार नाहीत.
महाविकास आघाडीमध्ये मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? यावरून धुमश्चक्री सुरू झाली आहे.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस,या दोन्ही घटक पक्षाचे म्हणणे आहे कि सर्वप्रथम सत्ता हाती येऊ द्या,त्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ.ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील,त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल,असे या दोन्ही घटक पक्षाचे म्हणणे आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला हट्ट सोडून समंजस भूमिका घ्यावी,असे घटक पक्षाच्या नेत्यांना वाटते.

