दीपक मोहिते,
पंचनामा,
जयदीप आपटे ; अटक कि शरणागती ? पोलिसांची भूमिका संशयास्पद,
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी फरार असलेला आरोपी जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी त्याला अटक केली का तो स्वतः हुन शरण आला याविषयी आता गूढ निर्माण झाले आहे.कारण दहा दिवसापासून फरार झालेला आपटे हा अचानक पोलिसांच्या हाती लागतो,यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही.कारण आपटे याच्या वकिलाने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.त्यांनी,” जयदीप हा स्वतःहून शरण आला असून पोलिसांनी त्याला पकडले नसल्याचे सांगितले.या जयदीपला पकडण्यासाठी पोलिसांनी सात पथके तैनात केली होती.पण त्याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले.या काळात जयदीप हा इंदोर येथे होता व तो आपल्या वकिलाच्या संपर्कात होता,जर तो आपल्या वकिलांच्या संपर्कात होता तर पोलिसांनी त्याच्या मोबाईलवरून झालेल्या संपर्काचे लोकेशन पोलिसांनी का शोधले नाही.या प्रश्नाचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे.जेंव्हा त्याच्या वकिलाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले,त्यानंतर तो आपल्या घरी परतला व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.तत्पूर्वी तो रेल्वेने कल्याण येथे येणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागला व त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात पाळत ठेवली होती,ज्या गाडीने तो येणार होता,ती गाडी स्थानकात आल्यानंतर पोलिसांनी गाडीचे सर्व डबे तपासले.पण जयदीप काही सापडला नाही.त्याने पोलिसांचा अक्षरशः पोपट केला व तो तोंडाला मास्क लावून घरी आला,तेथे त्याच्यावर घरावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.या सर्व घडामोडीवरून या प्रकरणी पोलिसांवर कोणाचा तरी दबाव होता,हे स्पष्ट झाले आहे.बदलापूर बलात्कार प्रकरणातही असेच घडणार आहे.त्याप्रकरणातही शाळेचे संस्थाचालक व अन्य काहीजण फरार आहेत.तेही पोलिसांना सापडत नाहीत.त्यामुळे या दोन्ही प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले आहे.जयदीप हा सध्या मालवण येथे पोलीस कोठडीत आहे.त्याला काल न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते.यावेळी झालेल्या सुनावणीमध्ये त्याच्या वकिलाने पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर,गुन्ह्यात लावण्यात आलेली कलमे व सार्व.बांधकाम विभागाने तयार केलेला चौकशी अहवाल,कसा चुकीचा आहे,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचे कलम लावणे चुकीचे आहे,पुतळा पडण्याच्या घटनेत कोणीही मृत्युमुखी पडला नाही,किंवा जखमी झाला नाही,त्यामुळे हे कलम लावणे कसे चुकीचे आहे, हे न्यायालयासमोर वकिलाने स्पष्ट केले.त्यामुळे जयदीपला लवकर जामिन मिळाल्यास आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये.

