दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गडचिरोली घटना ; राज्य सरकारला लाज वाटायला हवी,
राज्यात सत्तास्पर्धेला सध्या प्रचंड वेग आला असून आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे.नोव्हे.महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचे गृहीत धरून राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.महाविकास आघाडी व महायुती या दोघांमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.सत्ताधारी महायुतीचे नेते आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.त्यासाठी त्यांनी सरकारची तिजोरी रिकामी करण्यास सुरुवात केली आहे.लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी फस्त केला आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांवर बदलापूर बलात्कार घटनेने पाणी फिरवले आहे.काल गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्यावर चांगलेच तोंडसुख घेतले,ते एका कार्यक्रमात काय म्हणाले ते पहा,” अर्थखाते हे नालायक खाते असून या खात्याकडे आठ ते दहा वेळा फाईल पाठवली तरी ती परत येते.पण मी पण पक्का वस्ताद असून फाईल मंजूर होईपर्यंत त्यांचा पिच्छा सोडत नाही.त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवल्याचे मानण्यात येत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॅबिनेटमध्ये मतभेद निर्माण होणे,हे महायुतीला त्रासदायक ठरू शकते.” लाडकी बहीण,” योजनेचे श्रेय लाटू पाहणाऱ्या अजित पवार यांना एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांनी ” घरचा आहेर,” दिल्यामुळे अजित पवार गटाचे विमान सध्या बरेचसे खाली आहे.
एकीकडे राज्यात जीवघेण्या स्पर्धेला उत आला असताना दुसरीकडे मराठवाडा व विदर्भातील शेतकरी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झाला आहे.जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १.८२ लाख हे.वरील उभी पिके जमिनदोस्त झाली.त्यामुळे शेतकरी विमनस्क स्थितीत सापडला आहे.पण त्याच्याकडे पाहायला सत्ताधारी नेत्यांना वेळ नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका शेतात जाऊन फोटोसेशन करण्यात धन्यता मानली.या दोन्ही जिल्ह्यात कापूस व सोयाबीन,या दोन्ही कृषी उत्पादनाचे होत्याचे नव्हते झाले,पण मुख्यमंत्र्यांना या उध्वस्त शेतकऱ्यांना ” लाडका शेतकरी,” करावेसे वाटले नाही.महायुतीचे नेते राज्यातील जनतेला गृहीत धरून बेलगाम पद्धतीने वागत आहेत,पण ग्रामीण भागातील जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.गडचिरोली भागात वेळेवर शववाहिका न मिळाल्यामुळे आपल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्यांच्या आई व वडिलांना १५ की.मी.पायपीट करत आपले घर गाठावे लागले.गडचिरोली जिल्ह्यात जिमलगट्टा या गावात ही घटना घडली.”आपला दवाखाना,” योजनेचा उदो उदो करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आत्मपरीक्षण केले पाहिजे.गुलाबी जाकीट,गुलाबी फेटे घालून मिरवणाऱ्या नेत्यानी ग्रामीण भागातील हे वास्तव लक्षात घ्यावे व मतासाठी जी नौटंकी चालवली आहे,ती बंद करावी,अन्यथा ग्रामीण भागातील जनता लोकसभा निवडणुकीसारखी विधानसभा निवडणुकीतही ” पळता भुई थोडी करतील.”

