दीपक मोहिते,
राजकीय विश्लेषण,
उद्धव ठाकरे यांनी आततायीपणा करता कामा नये,
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून महायुती व महाविकास आघाडी या दोघांमध्ये सध्या अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे.कोणाला किती जागा मिळणार,यावरून असलेला वाद पराकोटीला पोहोचला आहे.जागावाटपाचा तिढा समाधानकारकरित्या सुटावा,यासाठी घटक पक्षाचे नेते प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना शिवसेनेने ( उबाठा ) घेतलेली ताठर भूमिका महायुतीच्या पथ्यावर पडणारी आहे.काल काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी हे सांगलीच्या दौऱ्यावर आले होते.शिक्षणसम्राट कै. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत तसेच त्यांचे फायरब्रॅंड प्रवक्ते हे देखील फिरकले नाहीत.हे दोघे का फिरकले नाहीत,यामागे दोन कारणे होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे व खा.संजय राऊत यांनी तिकीट वाटप जाहीर झाले नसताना सांगली लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रहार पाटील यांचे नाव परस्पर जाहीर केले होते.वास्तविक सांगली जिल्ह्यात त्यांच्या शिवसेनेची ताकद नगण्य असताना उद्धव ठाकरे यांनी हा आततायीपणा करायला नको होता.पण एका अज्ञात शक्तीने ते या दोघांना करायला भाग पाडले होते.त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले.वास्तविक ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार होती.कै.वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना येथून उमेदवारी देण्याचे काँग्रेसने नक्की केले होते.पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसला संजीवनी मिळू नये,यासाठी अशाप्रकारची खेळी केली या खेळीत मात्र उद्धव ठाकरे यांचे हसे झाले.विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले व त्यांनी पै.चंद्रहार पाटलांच्या पाठीला माती लावली.काँग्रेसचे विश्वजित पाटील यांनी या निवडणुकीत विशाल पाटील यांची कायम पाठराखण केली व रसद पुरवली.तसेच दुसरे कारण होते,निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करा,असा उद्धव ठाकरे यांनी आग्रह धरला होता.त्याकडे राष्ट्रवादी व काँग्रेसने दुर्लक्ष केले.अशा दोन कारणामुळे उद्धव ठाकरे यांना राग आला व त्यांनी मला वैयक्तिक कारणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे शक्य नाही,असे कळवून टाकले.विश्वजित कदम हे त्यांना आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते,पण त्यांनी मला यायला जमणार नाही,असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.त्यामुळे त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आले नाहीत.यापूर्वी उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन राहुल गांधी व सोनिया गांधी यांची अधून मधून भेट घेत होते,तेच उद्धव ठाकरे इंडिया गटाचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येतात,आणि उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाकडे फिरकत नाहीत,ही घटनाच मुळी आघाडीधर्माला छेद देणारी ठरली आहे.मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करणे,या मुद्द्यावरून बिनसल्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत या दोघानी आता आपल्या भाषणात राहुल गांधी यांचा उल्लेख टाळण्यास सुरुवात केली आहे.महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांच्या या मागणीचा विचार देखील केला असता पण शरद पवार यांनी,याच सुमारास आम्हाला मुख्यमंत्रीपदात बिलकुल स्वारस्य नसल्याचे सांगून जबरदस्त गुगली टाकली,त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यानीही ” तेरी भी चूप,मेरी भी चूप,” अशी भूमिका स्विकारली.शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत बोलकी अशीच होती.ते म्हणाले,” महायुतीचे सरकार खाली खेचणे,हे आपले एकमेव लक्ष्य आहे,ते सर्वप्रथम पूर्ण करू,” त्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे हे देखील शांत झाले.गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी जागावाटपात कोणतीही खळखळ न करता १० जागा घेतल्या व ८ जागा जिंकून आणल्या.यावेळी देखील ते समंजस भूमिका घेत इतरांपेक्षा कमी जागा घेतील व पुन्हा एकदा चमत्कार करतील,अशी शक्यता आहे.

