दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्य अधोगतीच्या मार्गावर जात आहे,
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.राज्याचे गृह खाते सपशेल अपयशी ठरले असून पुण्यासारखे शहर आता गुंड टोळ्यांचे शहर झाले असून दररोज होणाऱ्या हत्या,कोयता गँगचा हैदोस व अमली पदार्थाचा व्यापार,अशा कारणामुळे पुणे शहर हे ” गुंडाचे शहर,” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात्याची जबाबदारी पेलता आली नाही,त्यामुळे विरोधकाकडून त्यांच्यावर सतत टीकेचा भडिमार होत आहे.बदलापूर बलात्कार व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे,प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्या आहेत.सर्वसामान्य आरोपींना २४ तासात हुडकून काढणारे पोलीस,शाळेचे संस्थाचालक,मुख्याध्यापिका व शिल्पकार जयदीप आपटे,याना शोधू शकत नाहीत.गेल्या पंधरा दिवसापासून ते फरार आहेत,पोलिसांना ते सापडत कसे नाहीत.त्यांना लपण्यासाठी कोण तरी मदत करत असावेत,असा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे,तो चुकीचा नाही.
एकेकाळी सुशिक्षित व सामाजिक सलोखा असलेले शहर म्हणून पुण्याची ओळख होती,ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत पुसली गेली आहे.जरांगे पाटील यांच्या आंदोलनात गोरगरीब महिला व लहान मुलांना झोडपून काढणारे पोलीस,वरळी व पुणे येथे झालेल्या हिट अँड रन केसमधील आरोपींना झुकते माप देतात,यावरून पोलीस यंत्रणेची विश्वासार्हता किती लयाला गेली आहे,हे स्पष्ट होत आहे.खा.सुप्रिया सुळे व सुषमा अंधारे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी केली आहे.महायुतीचे नेते हे पोलीस अधिकाऱ्यांना कस्पाटा समान वागवत असतात.एका आमदाराने आपल्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसाला गाडी धुवायला लावली,पण गृहमंत्री या विषयी चकार शब्दही बोलत नाहीत.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती भयावह अशी असून हे राज्य आता अधोगतीच्या मार्गावर जाऊ लागले आहे.

