दीपक मोहिते,
त्यामुळे भाजपचे ” मिशन लोटस,” थंडावले…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेले रेशीमबाग सध्या चिंताग्रस्त झाले आहे.महाराष्ट्रात महायुतीची पुन्हा सत्ता येईल,असे संघाच्या धुरीणांना वाटत नाही.त्यामुळे त्यांनी फडणवीस यांच्यासोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जो पराभव झाला तो केवळ अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे झाला,असे संघाचे ठाम मत झाले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला ६५ ते ७० जागा मिळतील,असा संघाचा अंदाज आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बदलापूर बलात्कार व मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे.या दोन घटनांमुळे महायुती सरकारविरोधात निर्माण झालेले वातावरण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरेल,असे संघाला वाटतं.त्यामुळे भाजप,शिंदे व अजित पवार या तिन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवू नये,असा एक विचार या बैठकांमध्ये चर्चेला आला होता.पण त्यावर निर्णय होऊ शकला नाही.गेल्या तीन वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे राजकीय पक्ष फोडल्यामुळे लोकांमध्ये चुकीचे संकेत गेले व त्याचे परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागले,यावर संघाच्या अनेक नेत्यानी आपली परखड मते मांडली.त्यामुळे सध्या ” मिशन लोटस,” बासनात गुंडाळण्यात आले आहे.
तसेच महायुतीच्या नेत्यानी विधानसभा निवडणुकीपर्यंत ओबीसी व मराठा आरक्षण संदर्भात बिलकुल भाष्य करू नये,असे संघाने बजावले आहे.त्यामुळे महायुतीचा एकही प्रवक्ता यावर आपले मतप्रदर्शन करत नाही,तसेच नेतेही ” हाताची घडी,तोंडावर बोट,” अशा भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुका जिंकणे गरजेचे आहे,कारण महाराष्ट्रात जर आपला पराभव झाला तर त्याचे परिणाम इतर राज्यावर होण्याची शक्यता आहे,असे संघाचे म्हणणे आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासंदर्भात संघामध्ये दोन प्रवाह आहेत.तेही अजित पवार सारखे त्रासदायक ठरू शकतात,असे संघातील जुन्याजाणत्या नेत्यांचे म्हणणे आहे.तर काही नेत्यानी मनसेला वैचारिक बैठक नसून त्यांची भूमिका सारखी बदलत असते,त्यामुळे त्यांना सोबत घेण्यात धोका आहे.त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यानी त्यांचा विचार सोडून दिला आहे.
एकंदरीत संघाची भूमिका
लक्षात घेता विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे नेतृत्व बहुजन समाजाकडे जाण्याची शक्यता आहे.आणि हे नेतृत्व कोणा एका व्यक्तीकडे राहणार नाही तर ते सामूहिक असेल.

