दीपक मोहिते,
“हल्लाबोल,”
शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांची झोप उडवली,
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी व त्यांचे विश्वासू सहकारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप व अजित पवार गटातील आमदारांना तसेच जिल्ह्यातील नेत्याना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसापूर्वी शाहू घराण्याचे वारस व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांची झोप उडवून दिली आहे.घाटगे यांच्या प्रवेशावेळी झालेली सभा ही न भूतो,न भविष्यती,अशी भव्य दिव्य स्वरूपाची होती.त्या सभेला झालेली कागलवासीयांची गर्दी पाहून हसन मुश्रीफ यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे.समरजीत घाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक असामान्य तरुण नेतृत्व असून कागल व इतर तालुक्यात त्यांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे उभारले.कागल तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळवून दिला.तळागाळातल्या शेवटच्या माणसाशी थेट संपर्क राखणारा युवा नेता अशी त्यांची ओळख आहे.स्वच्छ प्रतिमा, सहकार क्षेत्रात असलेला दांडगा अनुभव,जनसंपर्क, प्रचंड ऊर्जा व शाहू घराण्याची पार्श्वभूमी,अशा गुणामुळे ते कोल्हापूरवासीयांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.अशा या घाटगे यांना शरद पवार यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले व त्यांना आपल्या पक्षात घेतले.हसन मुश्रीफ यांना शरद पवार यांनी लहानाचे मोठे केले,गेल्या २५ वर्षात पवारांनी त्यांना भरभरून दिले,पण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ते अजित पवार सोबत महायुतीमध्ये गेले.वास्तविक आघाडीमध्ये असताना त्यांचे व अजित पवार यांचे कधीच जमत नव्हते.पण ईडीच्या भितीमुळे ते अजित पवार गटात सामील झाले.हसन मुश्रीफ यांच्या या अशा वागण्याने शरद पवार त्यावेळी खूप दुखावले गेले होते.मात्र त्यांनी तो धक्का पचवला व आपल्या स्वभावानुसार त्यांनी हसन मुश्रीफ यांना जेरीस आणण्यासाठी जाळे विणण्यास सुरुवात केली.याकामी त्यांना प्रदेशाघ्यक्ष जयंत पाटील यांची मोलाची साथ मिळाली.शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात आपण पुरते सापडले आहोत,हे लक्षात आल्यानंतर मुश्रीफ आता आगपाखड करू लागले आहेत.त्यांचा सध्या तोल सुटला असून त्यांनी शरद पवार हे जातीय राजकारण करत आहेत,मला कळत नाही कि ते माझ्यामागे का लागले आहेत ? मी अल्पसंख्यांक असल्यामुळे मला त्रास देण्यात येत असल्याचे सांगत ते आता मायनॉरीटीचे कार्ड खेळू लागले आहेत.दुसरीकडे त्यांनी समरजीत घाटगे यांनाही धमकावण्यास सुरुवात केली आहे.पण समरजीत घाटगे हा युवा नेता,त्यांच्या धमक्यांना भीक घालणार नाही.आपल्याला राजकारणातून उखडून टाकण्याचा प्लॅन पवार व जयंत पाटील या दोघांनी आखला असल्याचे मुश्रीफ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा आता थयथयाट सुरू झाला आहे.पण शरद पवार व जयंत पाटील हे गुरूशिष्य आखाड्यातील पहिलवान असून मुश्रीफ यांच्या पाठीला माती लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.महायुतीचे आणखी काही आमदार व पदाधिकारी शरद पवार यांच्या संपर्कात असून त्यांचे ” मिशन खिंडार,” हे अधिक वेग पकडणार आहे.

