दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जम्मू – काश्मीर निवडणूक ; जगाचे लक्ष लागले आहे,
जम्मू व काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा येत्या १८ सप्टें.रोजी पार पडणार आहे.या विधानसभेच्या एकूण ९० जागासाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे.तर ४ ऑक्टो.रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.या निवडणुकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे अनुक्रमे २५ सप्टें.व १ ऑक्टो.रोजी होणार आहे.या निवडणुकीत सुमारे ८७ लाख ९० हजार मतदार आपला हक्क बजावतील.या विधानसभेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षानंतर होत आहेत.सध्या या राज्यात राष्ट्रपती राजवट आहे.या राज्याच्या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते,त्यानंतर आयोगाने या राज्यासह हरयाणा राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.वास्तविक या दोन राज्यासह महाराष्ट्र व झारखंड,या राज्याच्या निवडणुकाही आयोगाने घ्यायला हव्या होत्या,पण या दोन्ही राज्यात आपला पराभव होईल,अशा भितीमुळे भाजपने या निवडणुका ढकलल्या आहेत.आता या दोन्ही राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर त्या होणार आहेत.साधारणपणे या निवडणुका ऑक्टो.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हे.महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अशा तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष लागले आहे.३७० कलम हटवणे, लेह-लडाख व श्रीनगर केंद्रशासित करणे,या सर्व निर्णयानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.त्यामुळे मतदार कोणाला डोक्यावर घेतात,हे ४ ऑक्टो.रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी,फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स,गुलाम नबी आझाद यांचा डेमोक्रॅटिक आझाद पार्टी,भाजप व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,अशा पंचरंगी लढती होत आहेत.या व्यतिरिक्त कट्टर जातीयवादी म्हणून ओळख असलेला जमाती ए इस्लामी,हा आपले उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरवणार आहे.त्यांच्या संघटनेवर बंदी टाकण्यात आल्यामुळे त्यांना या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणे शक्य नाही.त्यामुळे त्यांनी ही शक्कल लढवली आहे.या निवडणुकीत जर काश्मिरी मतदारांनी भाजपला धोबीपछाड दिला तर ते मतदान ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाविरोधात असल्याचे मानले जाईल व ३७० कलम पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत येईल.या निवडणुकीत जर एकाही पक्षाला बहुमत मिळाले नाही,आणि जमात- ए- इस्लामी यांचे १० ते १२ अपक्ष उमेदवार निवडून आले तर सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते.त्यांच्या टेकुवर जर एखाद्या प्रादेशिक पक्षाने सरकार स्थापन केले तर या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा गंभीर बनू शकते.राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार येथे फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स व मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी,या दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.या दोन राज्याच्या निकालाचा परिणाम पुढे होऊ घातलेल्या महाराष्ट्र व झारखंड या दोन राज्यातील निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे.वास्तविक या दोन राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय भाजपच्या अंगलट येवू शकतो.त्यांनी घेतलेला हा निर्णय ” म्हणजे आजचे मरण,उद्यावर ढकलणे,” होय.

