दीपक मोहिते,
सूर्यातीर,
गडकिल्ल्याचे संवर्धन ही काळाची गरज,
पालघर जिल्हा हा निसर्गरम्य समुद्रकिनारा,हिरवेगार बागायती,शेती व पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.या व्यतिरिक्त जिल्ह्यातील गडकिल्ले व कोट,हे पर्यटक व गिर्यारोहकांची आकर्षणे आहेत.दरवर्षी पावसाळ्यात अनेक गिर्यारोहक हे गडकिल्ले व कोट सर करण्यासाठी आवर्जून येत असतात.पण यापैकी अनेक गडकिल्ल्याची दुरावस्था झाली आहे.आजवर संबधित विभागाने या गडकिल्ल्याच्या संवर्धनाकडे लक्ष दिले नाही,त्यामुळे अनेक गडकिल्ले नामशेष होण्याच्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळतात.
जिल्ह्यात आजच्या घडीला ५० हुन अधिक गडकिल्ले आहेत.त्यामध्ये आशेरी,असावा,कोहोज,
काळदुर्ग,शिरगाव,कामण, टकमक,वज्रगड,गंभीर,
भूपतगड,मंदाग्नी किल्ला,बल्लाळ गड,तारापूर,दांडा,डहाणू किल्ला,अर्नाळा,वसई किल्ला,केळवे,उतवड,
तांदुळवाडी,पारगाव कोट,दातीवरे कोट,कोरे कोट,सरतोडी कोट,मथाने कोट,चटाळे कोट,एडवण व खटाळे व १५ ते २० गड, किल्ले व कोट यांचा समावेश आहे.हा ऐतिहासिक ठेवा जपून ठेवण्याची गरज होती,पण राज्य सरकारने त्याकडे कायम दुर्लक्ष केले.त्यामुळे या गडकिल्ल्यावर सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही गिर्यारोहक हे गड सर करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.हे सारे गड किल्ले इतिहासाचे साक्षीदार असून त्याचे जतन व संवर्धन ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे,पण आपली नोकरशाही ती पार पाडत नाही.त्यामुळे शिरगाव,अर्नाळा व वसई हे किल्ले आज भग्नावस्थेत उभे आहेत.या किल्ल्याच्या वास्तू हळूहळू ढासळू लागल्या आहेत.ज्या नरवीर चिमाजी आप्पाने प्राणाची बाजी लावून पोर्तुगीझांच्या तावडीतून वसईचा किल्ला सोडवला होता,तो किल्ला आज प्रेमीयुगुले व दारुड्या मंडळींचे आश्रयस्थान बनला आहे.या किल्ल्यात पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे.त्यांच्या डोळ्यादेखत किल्ला दिवसेंदिवस ढासळतोय,पण या विभागाचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.
पालघर तालुक्याच्या पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या शिरगाव किल्ल्याची अवस्था अशीच आहे.या ऐतिहासिक किल्ल्याची डागडुजी व संवर्धन सोडा,पण स्थानिक प्रशासनाचे अधिकारी साधी पाहणी देखील करण्यासाठी फिरकत नाहीत.छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला होता.मराठ्यांच्या अगोदर या किल्ल्यावर पोर्तुगीझांचे वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.या किल्ल्याचे वैशिष्ट असे की हा किल्ला तटबंदीचा असून,त्याच्या भिंती आजही चांगल्या स्थितीत आहेत.या किल्ल्याच्या उत्तर – पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हाकीत आहे.हा किल्ला पर्यटक व इतिहासकाराना नेहमीच आकर्षित करत आला आहे.पण आज तो अश्रू ढाळत उभा आहे.
हे सर्व गडकिल्ले सरकारने एकवेळ विकसित केले नाहीत तरी चालेल,पण त्याची डागडुजी व संवर्धन या महत्वाच्या कामाकडे त्यानी दुर्लक्ष करता कामा नये.अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा येणाऱ्या काळात भूतकाळात जमा होईल.

