दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
धादांत खोटे बोलणारे फडणवीस साहेब,महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागा,
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल धादांत खोटे बोलले.विरोधी पक्षाचे याप्रश्नी सरकारला खिंडीत पकडणे व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला दगाफटका होईल,अशा भितीमधून फडणवीस हे सध्या बावचळले असून ते एकामागोमाग बेलगाम वक्तव्ये करत सुटले आहेत.
काल फडणवीस हे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते पहा,काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले,जवाहरलाल नेहरू यांच्या ” डिस्कव्हरी ऑफ इंडिया ,” या पुस्तकात शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक भाषा वापरण्यात आली आहे,त्याविषयी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे.त्यांचेहे वक्तव्य धादांत खोटं असून या पुस्तकात ते म्हणतात तसा उल्लेख कुठेही नाही.फडणवीस यांनी केलेला हा प्रकार ” खोटे बोल,पण रेटून बोल,” असाच होता.ज्या फडणवीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना ” महाराष्ट्र भूषण,” पुरस्कार दिला,त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात त्यांनी काय लिहिले आहे,हे जरा डोकावून पाहावे.उगाच ” साप साप,असे ओरडत जमीन धोपटू नये,” असे महाराष्ट्राचे त्यांना सांगणे आहे.ब्रिटिशांनी १९४४ दरम्यान जवाहरलाल नेहरू याना कारावासात टाकले होते,त्यावेळी त्यांनी ” डिस्कव्हरी ऑफ इंडिया,” हा ग्रंथ लिहिला.त्यांच्या या ग्रंथाला जगभरातील देशाने मान्यता दिली होती.हा इतिहास फडणवीस यांनी हे लक्षात घ्यायला हवे.पण भाजप व त्यांच्या मातृत्व संघटनेचा भर हा गोबेल्स नितीवर असल्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेण्यासारखे आहे.त्यामुळे फडणवीस यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ” डिस्कव्हरी ऑफ इंडिया,” या पुस्तकात कोणत्या पानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक लिखाण आहे,ते जाहीर करावे,अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.

