दिपक मोहिते,
फ्रंटलाईन,
आमच्या अपेक्षा पूर्ण होणार का ?
पालघर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद,ही दोन महत्वाची कार्यालये नव्या वास्तूमध्ये स्थलांतरीत होऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली.या वास्तूमधून सर्वसामान्य नागरिक, आदिवासी,शेतकरी व समाजातील विविध घटकांना दिलासा मिळू शकेल,असे कामकाज होईल,अशी अपेक्षा होती.त्या कितपत पूर्ण झाल्या याबाबतचा लेखाजोगा मांडण्याची गरज वाटली म्हणून हा लेखप्रपंच.जिल्हा प्रशासनाचा आजवरचा अनुभव अत्यंत कटू असल्यामुळे जिल्हावासीयांनीही प्रशासनाकडून फारशा अपेक्षा बाळगल्या नव्हत्या.नवा जिल्हा अस्तित्वात आल्याच्या घटनेला गेल्या महिन्यात एक दशक पूर्ण झाले.सुरुवातीच्या काळात मुख्यालयासाठी स्वतःची वास्तू नसल्यामुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणी भेडसावत होत्या.पण शासनाने पालघर शहरात जिल्हा प्रशासकीय कामकाज चालवण्यासाठी भव्य-दिव्य वास्तू उभारली.
गेल्या सात वर्षात जिल्हा परिषदेत पहिली पाच वर्षे युतीची सत्ता होती,गेल्या चार वर्षापासून सत्तेची सूत्रे सेनेच्या हाती आहेत.पण जिल्ह्याचे मागासलेपणा आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.मूलनिवासी आदिवासी समाजाला आजही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे,हजारो आदिवासी बालके कुपोषणाच्या दारात आहेत,बालमृत्यूचा वेलू गगनावर गेला आहे,रोजगारासाठी आदिवासी समाजाचे स्थलांतरण सुरूच आहे,आदिवासी तरुण हाताला काम नसल्यामुळे विमनस्क स्थितीत सापडला आहे,आदिवासी पाडे पाण्यासाठी तहानलेले आहेत,बालमृत्यू थमण्याचे नांव घेत नाही,शाळाबाह्य आदिवासी मुलांची संख्या चढत्या भाजणीवर आहे,गेल्या सात वर्षात जिल्ह्यात वारंवार दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली,अतिग्रामीण भागात चालायला धड रस्ते नाहीत,आजारी व्यक्ती व गरोदर महिलाना झोळीची कावड करून न्यावे लागते.गेल्या सात वर्षात हजारो कोटी रु.चा निधी मिळूनही जिल्हा विकासाच्या बाबतीत मागासलेलाच राहिला,यास लोकप्रतिनिधी व नोकरशाही जबाबदार आहेत.अशा सर्व परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने २६९ कोटी रु खर्चून बांधण्यात आलेल्या या नव्या वास्तूत तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी गृहप्रवेश केला.जिल्हा प्रशासनाकडून जिल्हावासीयांच्या माफक अपेक्षा होत्या,पण त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.ज्या शहरात मुख्यालय आहे,ते पालघर शहर आजही विकासाच्या बाबतीत मागासलेलेच आहे.वाहतूक कोंडी,चालायला धड रस्ते एसटी आगार,वाहनतळ,मार्केट नाही,सर्वत्र कचरा व दुर्गंधीचे साम्राज्य,अशी अवस्था आहे.या नवीन वास्तूमधून प्रभावी कामकाज होईल,अशी जिल्हावासीयांची अपेक्षा होती,पण ती दुर्देवाने पूर्ण होवू शकली नाही.

