दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
दक्षिण आशिया अशांत करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न,
अमेरिकेने तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी
अफगाणिस्तानातुन आपले सैन्य माघारी निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी देखील वेगाने केली होती.या घटनेला आज तीन वर्षे पूर्ण झाली.१९७० दरम्यान व्हिएतनाममधून नाचक्की होऊन सैन्य माघारी बोलवणाऱ्या अमेरिकेला अफगानिस्तानातही तशीच नामुष्की पत्कारावी लागली.अमेरिकेच्या सैन्याचे माघारी परतण्याच्या घटनेमुळे दक्षिण आशिया खंडावर त्याचे दूरगामी परिणाम होतील,असा अंदाज त्यावेळी होत होता.या सर्व घडामोडीनंतर तालिबान,रशिया,पाकिस्तान व चीन,हे एकत्र येतील व त्यांची ही एकजूट आपल्याला धोकादायक ठरेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.तसा तो अंदाज काही अंशी खरा ठरला आहे.
अफगाणिस्तानात काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या नादी लागून आपल्या सरकारने विविध प्रकल्प उभारण्याकामी हजारो कोटी रु.ची गुंतवणूक केली आहे.त्या देशाच्या संसदेची वास्तू देखील आपण ७०० कोटी रु.खर्चून उभारली आहे.या सर्व गुंतवणुकीवर आपल्याला पाणी सोडावे लागेल,अशी भिती वाटत होती.पण तालिबान सरकारने भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला व आपला जीव भांड्यात पडला.आज तालिबान सरकार व अफगाणी नागरिकांना भारताबद्दल प्रचंड सहानुभूती आहे.भविष्यात काय होईल,हे सांगता येत नसले तरी,या देशाला पाकिस्तानपेक्षा भारत जवळचा वाटतो,कारण अमेरिका-तालिबान युद्धात आपण तटस्थ राहिलो.या उलट पाकिस्तानने अमेरिकेला आपल्या देशात लष्करी तळ उभारू दिले.त्यामुळे तालिबानी हे पाकिस्तानला शत्रूराष्ट्र मानतात.
अमेरिकेची परराष्ट्र निती ही तेल खरेदी व शस्त्रविक्री अशा व्यापारीवृत्तीवर अवलंबून आहे.गेली ६५ वर्षे अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरत आपल्या विरोधात प्रचंड कारवाया केल्या.१९७१ च्या भारत-पाक युद्धात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन व परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर,या दोघांनी आपल्या विरोधात सातवे आरमार पाठवले होते.ज्या दिवशी सातवे आरमार आपल्या दिशेने निघाले,त्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रातोरात मॉस्को गाठले होते.त्यांनी रशियाचे पंतप्रधान अँलेक्सी कोसीजीन यांची भेट घेतली व परिस्थितीची कल्पना दिली.रशिया कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या मैत्रीला जागला व भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.त्यानी अमेरीकेच्या सातव्या आरमाराला रोखण्यासाठी भारताला कुमक पाठवली.रशियन पाणबुडी भारताच्या दिशेने निघाल्याचे अमेरिकेला कळताच अमेरिकेने हिंदी महासागरातून पळ काढला.हा इतिहास सांगण्याचे कारण असे की आज आपण अमेरिकेच्या नादी लागून रशियासारखा
सच्चा मित्र गमावला आहे.अमेरिका हा देश आशिया खंडातील अशांत टापूकडे व्यापारी चष्म्यातून पाहत असतो,अरब राष्ट्रातील तेल विहिरीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी तो कोणत्याही थराला जातो.दक्षिण आशिया खंडातील देशात युद्धसदृश्य परिस्थिती कायम राहावी,यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो.चीन,पाक,
अफगाणिस्तान,नेपाळ व रशिया,या देशाचे एकत्र येणे,आपल्याला त्रासदायक ठरू शकते.कालांतराने या साखळीत इराण,इराक,सीरिया,
जॉर्डन,
तुर्कस्तान ही मुस्लिम राष्ट्र देखील दाखल होतील.कारण ही सर्व राष्ट्रे अमेरिकेच्या दादागिरीमुळे यापूर्वीच विरोधात उभी ठाकली आहेत.अशा परिस्थितीमध्ये भारत एकाकी पडणार आहे.अमेरिका व इस्त्रायल या दोन राष्ट्रावर या सर्व घडामोडींचा फारसा परिणाम जाणवणार नाही.आपल्याला मात्र खूप काही सहन करावे लागणार आहे.तीन वर्षांपूर्वी श्रीलंका व आता बांगला देशात जे काही घडलं,त्यामागे अमेरिकाच आहे.अमेरिकेचे एक विशिष्ट असे की हा देश मैत्रीचा हात पुढे करतो आणि मागून वार करतो.आज आपण याच अमेरिकेच्या जवळीक साधली आहे.त्यामुळे भविष्यात आपला देखील घात करण्यास तो मागे पुढे पाहणार नाही. अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून रशिया,चीन समर्थक विरुद्ध अमेरिका समर्थक आपण व इस्त्रायल,अशी विभागणी होऊन पुन्हा शीतयुद्धाला सुरुवात होणार आहे,आणि यामध्ये आपले नुकसान होणार आहे.
या शीतयुद्धाचे रूपांतर जर प्रत्यक्ष युद्धात झाले तर ते आणखी एक जागतिक महायुद्ध ठरू शकते.

