दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
” चले जाव,” ते ” जोडो मारो,” हा प्रवास मनाला क्लेश देणारा,
महाविकास आघाडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी ” जोडो मारो,” आंदोलन केले.त्यांच्या या आंदोलनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.कारण हे प्रकरण महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमानाशी संबधित आहे.मात्र गेल्या तीन वर्षांपासून या राज्यात ज्या काही घडामोडी घडताहेत,त्या फुले,आंबेडकर,
शाहूमहाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभेशा नाहीत.ज्या मुंबई शहरात गोवालिया टॅंक या मैदानावरून साडेसात दशकापूर्वी ऑगस्ट क्रांती मैदानावरून इंग्रजांना ” चले जाव,” चा आदेश देण्यात आला,त्या शहरात आपल्या राज्यकर्त्यांना आता जोडे मारायची पाळी आपल्यावर आली आहे.आज हुतात्मा चौक ते गेटवे,असा मोर्चा काढण्यात आला.महात्मा गांधी यांचे ” चले जाव,” ते आजचे ” जोडो मारो,” हा जो प्रवास आपण पाहत आहोत,यावरून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो,तो म्हणजे भारतीय राजकारणाचा स्तर आता चांगलाच खालावला आहे.
महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना महायुतीच्या सरकारने विशेष खबरदारी घ्यायला हवी होती.पण शिंदे सरकारने ती घेतली नाही आणि पुतळा कोसळल्यानंतरही त्यांनी वास्तव काय आहे,याची माहिती न घेता नको ती वायफळ बडबड केली.राज्याच्या प्रमुखपदी असणाऱ्या व्यक्तीने असा संवेदनशील विषय हाताळताना परिस्थितीचे भान ठेवायला हवे होते,पण त्यांनी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी लोकांची मने दुखावतील असे वर्तन केले.पुतळे बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या या सहजासहजी मिळत नसतात.त्यासाठी आचारसंहिता आहे.पण मालवण-राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेल्या पुतळ्याचे बांधकाम हे आचारसंहिता व तमाम कायदे धाब्यावर बसवून करण्यात आले.विशेष म्हणजे राज्यशासनातर्फे कोणत्याही पुतळ्याचे बांधकाम होत असताना त्याचे प्रत्येक टप्प्यावर संबधित विभागाकडून पाहणी करण्यात येत असते,पण या प्रकरणात ही व्यवस्था बासनात गुंडाळून ठेवण्यात आली होती,असे दिसून आले आहे.त्यामुळे ठेकदाराचे फावले व ही अप्रिय घटना घडली.लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांनी हे सारे उपदव्याप केले होते,ते आता त्यांच्या अंगलट आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे जमिनदोस्त होणे,ही घटना नक्कीच क्लेशदायक आहे.त्याहीपेक्षा राज्यसरकारचा निर्लज्जपणा हा संतापजनक आहे.त्यामुळे विरोधकांच्या आजच्या ” जोडो मारो,” आंदोलनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.या आंदोलनानंतर तरी सत्ताधारी मंडळींचे डोळे उघडतात का ? हे पाहावे लागेल.पण गेल्या साडेसात दशकात ” चले जाव,” ते ” जोडो मारो,” असा जो प्रवास झाला आहे,तो मनाला पटणारा नाही.

