दीपक मोहिते,
मुख्यमंत्री शिंदे यांनी उशीरा का होईना,केसरकरांचे कान चांगलेच उपटले,
उशीरा का होईना,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अखेर जाग आली.त्यांनी शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराबद्दल शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे कान चांगलेच उपटले आहेत.पण मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर केसरकर यांनी जे अकलेचे तारे तोडले होते,त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी होती.पण शिंदे यांच्या मंत्र्यांना सर्व गुन्हे माफ आहेत.त्यामुळे या केसरकरच्या पावलावर पाऊल ठेवत आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत पण धुमाकूळ घालू लागले आहेत.ज्या व्यक्तीला शिक्षण क्षेत्रातील एबीसीडी माहीत नाही,ती शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करणार नाही तर काय करणार ? त्यांचे दुसरे मंत्री हे डॉक्टर आहेत,पण राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून त्यांचे किती योगदान आहे ? हा एक संशोधनाचा विषय आहे.ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मृत्यूशय्येवर असताना,याना आता राजकीय उलट्या होऊ लागल्या आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांना आता शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात महायुतीची नाचक्की होत असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
आज त्यांनी केसरकर यांना खडे बोल सुनावले आहेत,ते काय म्हणाले ते पहा,” शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, तर प्रत्यक्षात कृती करा,शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा,अशा शब्दांत त्यांनी केसरकरना तंबी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करत असताना बदलापुरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण राज्यात सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे.या घटनेने राज्यात चुकीचे संकेत गेले व त्याचा फटका येत्या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो,अशी भिती मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

