दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
तानाजी सावंत ” गेमचेंजर,” ठरतात कि काय ?
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी ” आपल्याला उलटी होते,” असे सांगून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला वेशीवर टांगले होते.त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीच्या घटक पक्षात जोरदार पडसाद उमटले व अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.या घटनेला काही तास उलटत नाही तोच तानाजी सावंत यांनी पुन्हा,” ऐकून घेतो,म्हणून काहीही ऐकून घेणार नाही,आपल्या औकातीत राहायचं,”अशी गर्भित धमकीच देऊन टाकली.त्यामुळे आता पुन्हा ” तीन पैश्याचा तमाशा,” सुरू होण्याची शक्यता आहे.
फटकळ स्वभावाचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे सध्या महायुतीचे आरोग्य बिघडवण्याच्या कामाला लागले आहेत.गेल्या चार दिवसात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचा गट चांगलाच रक्तबंबाळ झाला आहे.काल त्यांनी थेट धमकी देऊन ” ओल्या जखमेवर मीठ चोळले,” आहे.तानाजी सावंत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एवढे मोठे धाडस कसे काय करू शकतात,यामागे नक्की कोण आहे ? अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतरही सावंत म्हणतात,” आपल्या औकातीत राहायचे,” त्यामुळे या सर्व घडामोडींची संगती कशी लावायची ? असा प्रश्न उभा ठाकला आहे.
महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विषयी असलेली प्रचंड नाराजी आता उघडपणे दिसू लागली आहे.या गटाला सोबत घेतल्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्याला जसा फटका बसला,तसा तो आगामी विधानसभा निवडणुकीतही बसेल,अशा भितीमुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे व भाजपच्या आमदारामध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेक जण ” अजित पवार गटाची संगत नको रे बाबा,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.दस्तुरखुद्द अजित पवार यांचेही अनेक आमदार महायुतीमधील धुसफुसीमुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.इंदापुरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील,हे देखील अजित पवार यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून आता भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या तयारीत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव अटळ आहे,अशा भितीमुळे सध्या महायुतीमध्ये सध्या प्रचंड चलबिचल निर्माण झाली आहे.त्यामुळे तानाजी सावंत सारखी मंडळी आता जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करू लागली आहेत.

