पालघर,
वाढवण बंदराच्या मार्गात विरोधकांनी अडथळे आणले-पंतप्रधान मोदी,
मी शिवरायांच्या चरणी पाया पडून माफी मागतो,तसेच शिवरायांची मनोभावे पूजा करणाऱ्यांचीही माफी मागतो,असे उदगार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी काढले,यावेळी व्यासपीठावर राज्यपाल पी.राधाकृष्णन,केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल,राजीव शिवरंजन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,व अन्य मान्यवर उपस्थित होते.मात्र त्यांच्या या माफीला माफी नाही,अशी प्रतिक्रिया शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमाना दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी या सर्वांची भाषणे झाली.
आज डहाणू-वाढवण येथे ७६ हजार कोटी रु.खर्च करून उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पडले.तत्पूर्वी पंतप्रधानाच्या हस्ते मत्स्यव्यवसाय योजनांचा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज,हे आराध्य दैवत असून मी मालवण येथे झालेल्या दुर्घटनेविषयी महाराजाची माफी मागतो.मित्रानो,आज बंदराची झालेली पायाभरणी हा विकसीत भारताचा एक भाग आहे.आपल्या राज्याकडे विकासासाठी आपल्याकडे साहस पण आहे व संसाधने देखील आहेत.त्यामुळे आज वाढवण बंदराचा पाया रचला गेला आहे.या बंदरासाठी ७६ हजार कोटी रु. खर्च होणार आहेत.देशात असलेली एकूण सर्व बंदराचे काम या एका बंदरात होणार आहे.आपल्या देशाचे सामर्थ्य हे समुद्री ताकदीत आहे.पण स्वातंत्र्योत्तर काळात त्याकडे लक्ष दिले गेले नाही.पण आता नवा भारत आकाराला येत आहे.आमच्या सरकारने समुद्रकिनारी असलेल्या परिसराच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.त्यामुळे कोट्यवधी रु.ची गुंतवणूक होऊ लागली आहे.उद्योगधंद्यात लक्षणीय वाढ होत आहे.बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकले.देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान फार मोठे आहे.पण विरोधकांनी विकासकामांना कायम ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला.हा प्रकल्पही मार्गी लागू नये,यासाठी मार्गात अनेक अडथळे आणले.हे लोक प्रगत महाराष्ट्राला मागे ठेवू पाहत आहेत.२०१४ साली देशात ८० लाख टन मत्स्यउत्पादन होत होते,ते आज १७० लाख टनावर गेले आहे.त्यामुळे मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढले आहे.या क्षेत्रात आपला देश जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.तुम्हा मच्छीमारांची ताकद वाढवण्यासाठी मच्छिमार संस्था मजबूत करण्यात येत आहेत.महिला सक्षमीकरणाही महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे.मच्छिमार महिलांनाही आम्ही आर्थिक सहाय्य देत आहोत.हा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे,या बंदराकडे जगाचे लक्ष लागले आहे.तसेच सरकार मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी मासेमारी बोटीवर अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्यात यावे,अशी मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.

