दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
पराभवाच्या भितीमुळे अजित पवार आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत,
मालवण-राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर तब्बल ९६ तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याची जाहीर माफी मागितली आहे.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी उपरती झाली व त्यांनीही महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची जाहीर माफी मागितली व त्यानंतर आता त्यांनी ठिकठिकाणी या प्रकरणी आंदोलने करण्यास सुरुवात केली आहेत.सरकारमधील घटक पक्षाने आंदोलन करणे,हे राज्याला काही नवीन नाही.पण अजित पवार गटाला ही अशी उपरती का व्हावी ? या मागची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेणे गरजेचे आहे.
सदर पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये विद्यमान सरकार विरोधात प्रचंड रोष आहे,मराठा नेता जरांगे पाटील हे देखील आज मालवण येथे दाखल होत आहेत.या सर्व घडामोडीचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला बसू शकतो,अशा भितीतून अजित पवार यांनी माफी मागितली व थेट आंदोलने सुरू केली.पण या आंदोलनाचा पवार यांच्या गटाला फायदा होईल,असे वाटत नाही.कारण सरकार विरोधात महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असलेला रोष अद्याप कमी झालेला नाही.त्याची प्रचिती काल अजित पवार यांची यात्रा बीडमध्ये आली असताना अजित पवार यांना आली.यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी त्यांना घेराव घातला,तर हिंगोली येथे झालेल्या त्यांच्या जाहीर सभेत मराठा समाजाच्या असंख्य कार्यकर्त्यानी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.राज्यात आपल्याला होणारा विरोध लक्षात घेऊन सर्वप्रथम अजित पवार यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी मी राज्याच्या १३ कोटी जनतेची माफी मागतो,असे स्पष्ट केले होते.त्यानंतर काल त्यांच्या पक्षाने विविध ठिकाणी लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून आंदोलने केली.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचलेल्या अजित पवार यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे.मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस या दोघांपासून दोन हात दूर राहण्यात शहाणपण आहे,हे त्यांनी ओळखले असून सध्या ते ” एकला चलो रे,” अशा भूमिकेत आले आहेत.

