दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुतीला परिणाम भोगावे लागतील,
बदलापूर बलात्कार व मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,या दोन घटनांमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काल सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा,त्याची निंदा करावी तेवढी थोडीच….या राड्याच्या वेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक हे दोन अधिकारी अत्यंत बेजबाबदारपणे वागले.महाविकास आघाडीचे नेते मालवण मध्ये येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काही तरी गडबड होणार,हे लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवायला हवा होता.तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी दुसरी वेळ द्यायला हवी होती.पण या दोघांनी काहीही न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.जिल्हाधिकारी तर राडा सुरू झाल्याबरोबर गायब झाले.पोलीस अधीक्षक स्तब्ध उभे राहून सुरू असलेला राडा बघत होते,आणि महाभारत घडून गेल्यानंतर त्यांनी अतिरिक्त पोलीस मागवली.ही उपाययोजना म्हणजे ” वरातीमागून घोडे,” अशा स्वरूपाची होती.
कालच्या घटनेने उभ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.तशी ती बदलापूर घटनेमुळे देखील गेली होती.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत,त्या दैवताचा पुतळा पत्याच्या बंगला कोसळतो तसा कोसळावा,यासारखे दुसरे दुर्देव नाही.त्यामुळे आपल्या राज्यात भ्रष्टाचार कोणत्या थराला पोहोचला आहे,याचा अनुभव या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला आला.राज्यात गेल्या दोन वर्षात घडलेल्या अनेक घटनांचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीत हमखास उमटणार आहेत.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ” होत्याचे नव्हतं,” झालं तरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची धुंदी अद्याप उतरलेली दिसत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,या दोघांच्या कारभारावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व सध्या प्रचंड नाराज असून विधानसभा निवडणुकीनंतर या दोघांची पक्षश्रेष्ठी गठडी वळतील,अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे.अजित पवार हे स्वतःच आपले वाटोळे करून घेतील,असे या नेतृत्वाला ठाऊक असल्यामुळे शहा व मोदी त्यांना सध्या गृहीत धरत नाहीत.
” लाडकी बहीण,” ” लाडका शेतकरी,” या व इतर योजनांवर सार्वजनिक पैश्याची उधळपट्टी करणारे इन्व्हेंट आता रयतेच्या विस्मरणात गेल्या आहेत.विधानसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच,अशा इर्षेतून शिंदे व फडणवीस या जोडगोळीने या योजना जाहीर केल्या.पण बदलापूर व मालवणच्या घटनांमुळे त्या आता झाकल्या गेल्या आहेत.महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शिल्पकार जयदीप आपटे व स्ट्रक्चरल तज्ञ
चेतन पाटील हे दोघे आपल्या कुटुंबियांसह फरार झाले आहेत.ते स्वतःहून फरार झाले नसावेत,त्यांना फरार व्हायला लावले असावे.कारण जयदीप आपटे हा कोणाशी संबधित आहे,हे जगजाहीर आहे.वास्तविक घटना घडल्यानंतर शिंदे व फडणवीस,या दोघांनी संयम राखून वक्तव्ये करायला हवी होती.पण अहंकार व आक्रस्ताळेपणा ज्यांच्या ठायी ठायी भिनला आहे,अशा या दोघांनी बेताल वक्तव्ये करून जनतेचा रोष ओढवून घेतला आहे.त्याचे परिणाम त्यांना आगामी काळात भोगावे लागणार आहेत.
दरम्यान आज सकाळी एका चॅनेलवर एक बातमी पाहायला मिळाली,ती पाहून लोकांनी तोंडात बोटे घातली.बातमी होती,राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पुतळा पडल्या प्रकरणी राज्यभर आंदोलन करणार…
या घटनेचे वर्णन करायचे झाल्यास ” सौ चुहे खाकर,बिल्ली चली हजको,” असेच करावे लागेल…

