दीपक मोहिते,
पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा काळवंडला..
सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र नासवला,
आज मालवण-राजकोट येथे घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी खा.विनायक राऊत व जयंत पाटील मालवणात आले असता भाजपच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला तो अत्यंत लाजिरवाणी असाच होता.यावेळी झालेल्या हाणामारीकडे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.तर जिल्हाधिकारी अक्षरशः पळून गेले.पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहून आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षाचे नेते पाहणीसाठी आले असता खा.नारायण राणे व माजी खा.निलेश राणे हे दोघेपण त्याठिकाणी आले.त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्तेही दाखल झाले.भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी येऊ का दिले ? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.एकंदरीत घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय असून राज्यात जे काही सध्या घडत आहे,त्यावरून गृहखाते मृतावस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे.भाजपच्या कार्यकर्त्याकडून पोलिसांना मारहाण होत असताना एसपी केवळ बघत उभे होते.तर जिल्हाधिकाऱ्यानी अक्षरशः धूम ठोकली.परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर एसपीनी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली व त्यानंतर आदित्य ठाकरे शिवसैनिकांच्या संरक्षणात बाहेर पडले.दुसरीकडे पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले होते.पण ही उशीरा केलेली कारवाई ” वरातीमागून घोडे,” अशी होती.या सर्व प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांची भूमिका संशयास्पद होती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व माजी खा.विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर तसेच गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर जोरदार टीका केली.तर उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत येत्या १ सप्टेंबर रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते हे हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पायी जाऊन या सरकारला जोडे मारणार असल्याचे सांगितले.
आज महाराष्ट्राचे दैवत असलेले शिवाजी महाराजही स्वर्गात अश्रू ढाळत असतील,ते स्वतःलाच विचारत असतील,कि यासाठी मी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती का ? हिंदुत्वाचा सतत जयघोष करणाऱ्यांनी माझ्या पायाशी आपल्या मायबहिणींना मारहाण करणे,हे कोणते हिंदुत्व ? असा प्रश्न त्यांना पडला असवा…
पुरोगामी विचारसरणीचे राज्य म्हणून ज्या राज्याची ओळख होती त्या महाराष्ट्राला सत्ताधाऱ्यांनी पूर्णपणे नासवून टाकला आहे.त्याचा चेहरा काळवंडत चालला आहे.

