दीपक मोहिते,
महाराष्ट्राचे दुर्देव,
आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच ” वाईटातून चांगलं,” निर्माण होणार आहे..
दोन दिवसापूर्वी मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे,पण सत्ताधारी मंडळींना त्याचे बिलकुल सोयरसुतक नाही.आता केंद्र सरकारने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.पुतळ्याची जबाबदारी पार पाडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.तर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या अवशेषांची पाहणी करून या पुतळ्याचे नटबोल्ट गंजलेले आहेत,असा धक्कादायक अहवाल दिला.या राज्यात कधी काहीही घडू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणतात ते पहा..मुख्यमंत्री म्हणाले,या समुद्रिकिनारी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहल्यामुळे हा पुतळा कोसळला,तर केसरकर म्हणतात,वाईटातुन काहीतरी चांगलं होणार असेल,त्यामुळे हा पुतळा कोसळला असावा.या दोघांच्या अकलेची कींव करावी,तेवढी थोडीच होईल.मुख्यमंत्री शिंदे जे बोलले ते पाहता आपली विधानसभा,राजभवन,
वानखेडे स्टेडियम व मंत्रालय देखील समुद्रीकिनारी आहेत आणि या परिसरात दर पावसाळ्यात सोसाट्याचे वारे वाहत असतात.मग आम्ही काय समजायचे ? ” उचलली जीभ लावली टाळ्याला,” अस या राज्यात सतत होत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायम वेळ मारून नेण्यासाठी ” विरोधक हे या प्रश्नी घाणेरडे राजकारण करत असल्याचे ओरडत फिरत असतात.या पुतळ्याचा शिल्पकार हा कल्याण येथे राहणारा असून त्याला कोणाच्या शिफारशीवरून हे काम मिळाले,हे महाराष्ट्राच्या शिवप्रेमी जनतेसमोर आले पाहिजे.छत्रपती संभाजी महाराजांनी हा पुतळा चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आला असून तो बदलण्यात यावा,अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.पण त्यांच्या या पत्राकडे दुर्लक्ष करण्यात आले.या घटनेने महाराष्ट्राच्या रयतेच्या मनावर खोलवर जखमा झाल्या असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच ” वाईटातून चांगलं,” निर्माण होणार आहे.आता राज्यातील प्रत्येक मराठी माणूस विधानसभा निवडणूका कधी जाहीर होतात,याची आतुरतेने वाट बघत आहे.

