दीपक मोहिते,
सूर्यातीर-निवडणुक वार्तापत्र -२०२४,
१३० पालघर विधानसभा मतदारसंघ अनु.ज.
पालघर विधानसभा ; शिवसेना ( उबाठा ) पुन्हा वर्चस्व राखणार,
पालघर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर मतदारसंघावर २००९ चा अपवाद वगळता एकसंघ शिवसेनेचा अभेद्य असा गड होता.मात्र २००९ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र गावित हे मतविभागणीचा फायदा मिळवून विजयी झाले होते.पण त्यानंतर मात्र गावित यांना ही जागा जिंकता आली नाही.२०१४ साली ही जागा शिवसेनेने पुन्हा खेचून घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आ.कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन येथे सेनेतर्फे निवडणूक लढवली व केवळ ५१५ मताधिक्याने ही जागा जिंकली.यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत कृष्णा घोडा यांना ४६ हजार १४२ तर तर राजेंद्र गावित यांना ४५ हजार ६२७ मते मिळाली.या निवडणुकीदरम्यान राज्यात सेना-भाजप युती तुटली होती,त्यामुळे भाजपने येथे डॉ.प्रेमचंद गोंड याना उभे केले होते.त्यांना ३४ हजार १४९ मते पडली.गोंड यांनी चांगली मते घेऊनही सेनेच्या कृष्णा घोडा यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती.त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव अमित घोडा यांनी सेनेतर्फे ही जागा लढवली व या पोटनिवडणुकीत त्यांनी गावित यांना धूळ चारली.२०१९ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे योगेश शंकर नम यांनी येथून निवडणूक लढवली.सरळ लढतीत श्रीनिवास वनगा यांनी त्यांचा ४० हजार ३०५ मतांनी पराभव केला.या लढतीत वनगा याना ६८ हजार ४० तर नम यांना २७ हजार ७३५ मते मिळाली.तर तिसरे उमेदवार मनसेचे उमेश गोवारी यांना १२ हजार ८१९ मते मिळाली व ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.
यंदा होणाऱ्या निवडणुकीत ही जागा एकनाथ शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.या जागेवर शिवसेना ( उबाठा ) शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व मनसे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.सेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी व शिवसेनेतर्फे ( एकनाथ शिंदे गट ) नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.श्रीनिवास वनगा यांचा आमदारकीचा काळ निराशाजनक राहिल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे.शिंदे गटातर्फे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांचे नांव चर्चेत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांनी लक्षणीय मते घेतली होती.त्याना ९३ हजार ५९१ व शिवसेनेच्या ( उबाठा भारती कामडी यांना ५४ हजार ३५२ मते मिळाली तर तिसरे उमेदवार बविआचे राजेश पाटील यांना केवळ २३ हजार ५३० मतावर समाधान मानावे लागले.यंदाची विधानसभा निवडणुक जिंकणे शिंदे यांना शक्य होणार नाही,कारण उद्धव ठाकरे यांना या मतदारसंघात प्रचंड सहानुभूती आहे.तसेच त्यांच्याकडे भारती कामडी सारखा चेहरा आहे.उद्धव ठाकरे यांच्या या उमेदवाराच्या तोडीस तोड असा उमेदवार शिंदे गटाकडे नसल्यामुळे या विधानसभा जागेवर शिवसेना ( उबाठा ) पुन्हा मोहर उठवण्याची शक्यता आहे.

