दीपक मोहिते,
सूर्यातीर निवडणूक वार्तापत्र २०२४,
१३३- वसई विधानसभा मतदारसंघ,
वसई विधानसभा निवडणूक ; पुन्हा आ.हितेंद्र ठाकुरच,
या मतदारसंघावर गेली तीन दशके आ.हितेंद्र ठाकूर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे.त्यांना पराभूत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांनी जंग जंग पछाडले,पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरात अपयश पडले.२००९ ची एकमेव विधानसभा निवडणुक वगळता आ.ठाकूर यांनी १९९० पासून सलग सहा निवडणुका एक हाती जिंकल्या.विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या मताधिक्यात वाढ होत गेली.२००९ साली त्यांनी स्वतः निवडणूक न लढवता आपले विश्वासू सहकारी नारायण मानकर यांना उभे केले होते,पण मानकर याना अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.हा एकमेव अपवाद वगळता १९९०,१९९५,१९९९,२००४,२०१४ व २०१९ या सहा निवडणुका आ.ठाकूर यांनी सहजपणे जिंकल्या.विरोधकांनी अनेकदा एकजूट करून आ.ठाकूर यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला,पण त्यांचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले.२०१९ साली झालेल्या निवडणूकित विजयी झाल्यानंतर आ.ठाकूर यांनी आपण यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते पुन्हा रिंगणात उतरतील,असा अंदाज आहे.आपल्या शिवाय इतर कोणाला उमेदवारी दिली तर ते मतदारांना पसंत पडत नाही,हे २००९ साली आलेल्या अनुभवावरून ते या निर्णयाप्रत आले आहेत.याविषयी मतप्रदर्शन करत नसले तरी ते २००९ ची पुनरावृत्ती करतील,असे वाटत नाही.
या मतदारसंघात २०१९ साली झालेल्या निवडणुकीत आ.हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेच्या विजय पाटील यांचा २५ हजार ९५ मतांनी पराभव केला.एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत आ.ठाकूर याना १ लाख ०२ हजार ९५० तर विजय पाटील यांना ७६ हजार ९५५ मते मिळाली,तर मनसेच्या प्रफुल्ल ठाकूर यांच्यावर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली.त्यांना केवल ३ हजार ५४० मते पडली.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत आ.हितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांचा ३१ हजार ८९६ मतांनी पराभव केला.या निवडणुकीत आ.ठाकूर यांना ९७ हजार २९१ तर विवेक पंडित याना ६५ हजार ३९५ मते मिळाली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार मायकल फुर्टडो याना १६ हजार ४६७ तर समाजवादी नेते मनवेल तुस्कानो यांना ३ हजार ९८१ मते पडली.
मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.हेमंत सवरा यांनी या विधानसभा मतदारसंघात ९ हजार ४१९ मताधिक्य मिळवल्यामुळे ही जागा लढवण्यासाठी सारे विरोधी पक्ष आता सरसावले आहेत.या लढतीत डॉ.हेमंत सवरा याना ७६ हजार ३०७ व सेनेच्या भारती कामडी याना ६६ हजार ८८८ मते पडली.तर बविआचे राजेश पाटील यांना केवळ ५० हजार ८६८ मताचा पल्ला गाठता आला.या निवडणुकीत बविआ तिसऱ्या क्रमांकावर गेल्यामुळे सध्या भाजपमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.पण या मतदारसंघात एकाही राजकीय पक्षाकडे आ.ठाकूर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला आव्हान देऊ शकेल,असा एकही सक्षम उमेदवार नाही,तरी पण अनेक पदाधिकाऱ्यांनी गुढघ्याला बाशिंगे बांधली आहेत.मात्र या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे निकष लावून चालणार नाही,कारण येथील मतदार लोकसभेसाठी राष्ट्रीय पक्ष व विधानसभेला स्थानिक पक्षाच्या उमेदवाराला डोक्यावर घेत असतो.

