- दीपक मोहिते,
सुर्यातीर,निवडणूक वार्तापत्र,
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ-
या मतदारसंघावर बविआचेच वर्चस्व राहणार…
१३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघ हा बहुभाषिक मतदारसंघ असून येथे विविध जाती धर्माचे लोक राहतात.सन २००० नंतर या मतदारसंघात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व हे शहर पालघर जिल्ह्यात लोकसंख्येच्या बाबतीत क्रमांक १ चे शहर बनले.लोकसंख्या वाढीच्या तुलनेत पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.मात्र गेल्या चार ते पाच वर्षात परिस्थितीमध्ये बदल होत गेला.२००९ साली मतदारसंघाच्या फेररचनेत नव्याने या विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विद्यमान आ.क्षितिज ठाकूर यांनी बाजी मारली.त्यांच्या मतांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली.या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांनी त्यांच्या विरोधात हवा निर्माण केली होती.मात्र आ.क्षितिज ठाकूर यांनी प्रत्येक वेळी विरोधकांना धूळ चारली.२०१९ साली शिवसेनेने आ.ठाकूर यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याना या मतदारसंघात उतरवले होते.प्रदीप शर्मा यांनीही या निवडणुकीच्या प्रचारात साम,दाम,दंड व भेद नितीचा वापर केला,मात्र त्यांची डाळ शिजू शकली नाही.या दोघांमध्ये झालेल्या सरळ लढतीमध्ये आ.क्षितिज ठाकूर यांनी त्यांचा ४३ हजार ७२९ मतांनी पराभव केला. आ.क्षितिज ठाकूर याना त्यावेळी १ लाख ४९ हजार ८६८ तर प्रदीप शर्मा यांना १ लाख ०६ हजार १३९ मते पडली.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात चौरंगी लढत झाली होती.राज्यात युती तुटल्यामुळे शिवसेना व भाजप या दोघांनीही आपापले उमेदवार उभे केले होते.तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला होता.या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर यांनी भाजपच्या राजन नाईक यांचा ५४ हजार ४९९ मतांनी दारुण पराभव केला.आ.क्षितिज ठाकूर याना १ लाख १३ हजार ५६६ तर राजन नाईक यांना ५९ हजार ६७ मते मिळाली तर शिवसेनेचे शिरीष चव्हाण यांना ४० हजार ३२१ मतावर समाधान मानावे लागले.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अशोक पेंढारी यांना आपली अनामत रक्कम देखील वाचवता आली नव्हती.त्यांना केवळ ४ हजार ५५५ मते मिळाली.यंदा होणाऱ्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे,पण भाजपकडे आ.क्षितिज ठाकूर यांना टक्कर देईल,असा उमेदवार नसल्यामुळे भाजप या निवडणुकीत बाहेरचा उमेदवार लादण्याची शक्यता आहे.या मतदारसंघात उत्तर भारतीयांची संख्या प्रचंड असल्यामुळे डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचे नाव चर्चेत आहे.येथील मतदारांचे मतपरिवर्तन व्हावे,यासाठी विरोधी पक्षांनी गेल्या दोन वर्षांपासून अनेक आंदोलने,निदर्शने असा कार्यक्रम राबवला,पण त्यांना कितपत यश मिळेल,हे सांगणे कठीण आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विष्णू सवरा यांना या मतदारसंघात ५७ हजार ३५८ इतके
मताधिक्य मिळाले होते.तिरंगी लढतीत डॉ.सवरा याना १ लाख ३६ हजार ८१८,बविआच्या राजेश पाटील यांना ७९ हजार ४६० मते मिळाली.शिवसेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी यांना ६६ हजार १५० मतांचा पल्ला गाठता आला.या निवडणुकीत डॉ.सवरा यांना मिळालेली मते पाहून भाजपच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.मात्र येथील मतदार लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाला तर विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला डोक्यावर घेत असतो,असा आजवरचा अनुभव आहे.त्यामुळे या निवडणुकीत वेगळं काही घडेल,अशी शक्यता नाही. - क्रमशः
Trending
- इस्त्रायलच्या हेकेखोरपणामुळे युद्धविराम दृष्टिक्षेपात नाही…
- पक्षांतरबंदी कायदा ; कायद्यातील परिच्छेद ४ चा पुनर्विचार होणे गरजेचे….
- युद्धविराम ; जगाचा जीव भांड्यात पडला..
- शिक्षक घरी येणार ; विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून देणार, सरकारचे डोकं फिरलंय
- पुरोगामी राज्य अशी ओळख असलेले राज्य आता वेगळ्या वळणावर,
- अखेर अमेरिका गुडघ्यावर आली, ट्रम्पवर अमेरिकन जनतेचा वाढता दबाव,
- धोकादायक रेल्वेप्रवास ; कायमस्वरूपी तोडगा हवा,
- सोनम वांगचूक यांची अटक ; केंद्र सरकार तोंडघशी पडले,

