दीपक मोहिते,
कशासाठी केला आम्ही ” स्वराज्याचा अट्टाहास ? ”
तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी ओडीशा राज्यात घडलेल्या एका घटनेने देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते.या एका घटनेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या भारतीय संविधानाची राज्यकर्ते व नोकरशाहीने कशी मोडतोड केली आहे,हे आपल्याला पाहायला मिळाले.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करताना समता,सामाजिक बंधुभाव व समान न्याय यांस सर्वोच्च प्राधान्य दिले होते.त्यांच्या त्या दुरदृष्टीला छेद देणारी ती घटना होती.त्या दिवशी ” दाना माझी,” या व्यक्तीला आर्थिक चणचणीमुळे आपल्या पत्नीचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर वाहून न्यावा लागला.१२ कि.मी.अंतरावर असलेल्या स्मशानात तो व त्याची दहा वर्षाची मुलगी पायी चालत गेले.त्याच्या पत्नीचे प्रेत त्याने एकट्यानं खांद्यावर वाहून नेले,चालत असताना त्याची मुलगी धायमोकलून रडत होती.हे चित्र हृदय पिळटवून टाकणारे होते.हे चित्र पाहून सारे जग काही काळ स्तब्ध झाले.सर्वत्र संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.त्याची ही कृती आपल्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती.पण या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतो कि स्थानिक प्रशासन इतके मुर्दाड व असवेंदनशील कसे काय असू शकते ? आजही बिहार,झारखंड व ओडिशा या राज्याच्या ग्रामीण भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळते.समता,सामाजिक न्याय व सामाजिक बांधिलकी,यावर गेल्या ७८ वर्षात खुप काही बोलले व लिहिले गेले.पण प्रत्यक्षात देशाच्या ग्रामीण भागात काय स्थिती आहे,हे दीना माझीच्या कृतीने अधोरेखित झाले आहे.गेल्या ७८ वर्षात आपण ” सामाजिक व आर्थिक विषमता,” दूर करू शकलो नाही.आजही अनेक राज्याच्या ग्रामीण भागात लोक हलाखीचे जीवन जगत आहेत.यास शासकीय यंत्रणा जितकी जबाबदार आहे तितकेच आपण व आपले राज्यकर्तेही जबाबदार आहोत.महात्मा गांधीजीनी “स्वराज्याकडून सुराज्याकड़े,” पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरु शकले नाही.मुंबईपासून अवघ्या १०० कि.मी.अंतरावर असलेल्या मोखाडा,जव्हार व विक्रमगड तालुक्यातही अधून मधून असेच चित्र पाहायला मिळते.फक्त फरक एवढाच आहे कि,माझीला मृतदेह वाहण्यासाठी स्वतःच्या खांद्याचा वापर करावा लागला,तर या भागात चादरीची झोळी करून खांद्यावर कावड घ्यावी लागते.आज आपण पावलोपावली घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले भारतीय संविधान व महात्मा गांधी यांनी पाहिलेले ” खेड्यातील भारत,” याची आठवण काढत असतो.पण त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा आपण स्विकार केला का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र ” नाही,” असेच मिळते.कधी कधी असे वाटते कि आमच्या पूर्वजांनी केलेला ” स्वराज्याचा अट्टाहास,” हा नेमका कशासाठी होता ?

