दीपक मोहिते,
सूर्यातीर निवडणूक वार्तापत्र,
१२९ बोईसर विधानसभा,अनु.ज.
बोईसरमध्ये बविआ-शिवसेना ( शिंदे गट ) अशी सरळ लढत होईल,
मतदारसंघाच्या फेररचनेनंतर बोईसर विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली.२००९,२०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीने बाजी मारली.या विधानसभा मतदारसंघात वसई,विरार व नालासोपारा भागातील अनेक गांवाचा समावेश आहे,प्रत्येक निवडणुकीत त्याचा फायदा बविआला होत असतो.इतर ठिकाणी बविआची जी पीछेहाट होते,त्याची कसर वसईतील ही गावे भरून काढत असतात.मात्र हे मतदार लोकसभा निवडणुकीत आपली मते राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकत असतात.त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत बविआने सलग तीनवेळा विजय मिळवला.
गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांचे आ.विलास तरे यांनी बविआला सोडचिठ्ठी दिली व त्यांनी सेनेकडून उमेदवारी मिळवली.मात्र या निवडणुकीत भाजपच्या एका बंडखोर उमेदवारामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला.
बोईसर विधानसभा मतदारसंघाची रचना अगदी विचित्र आहे.पालघर,बोईसर,डहाणू व वसई या चार तालुक्यातील अनेक गावे एकत्र करून हा विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे.त्याचा फायदा प्रत्येक निवडणुकीत बविआच्या उमेदवाराला मिळत आला.गेल्या निवडणुकीत बविआचे राजेश पाटील यांना ७८ हजार ७०३ मते मिळाली तर सेनेच्या विलास तरे यांचा घोडा ७५ हजार ९५१ मतांवर अडखळला.सेनेचा उमेदवार पाडण्यासाठी त्यावेळी मुख्यमंत्रीपदी असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी संतोष जनाठे याना बंडखोरी करायला लावली होती.आपला उमेदवार निवडून यावा,यासाठी आ.ठाकूर यांनीही जी काही रसद पुरवायची होती ती या वंडखोर उमेदवाराला पुरवली होती.या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर उमेदवाराला ३० हजार ९५२ मते मिळाली व तरे यांचा अवघ्या २ हजार ७५२ मतांनी पराभव झाला.संतोष जनाठे रिंगणात नसते तर राजेश पाटील यांना निवडणूक जिंकणे कठीण होते.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत बविआच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या विलास तरे यांना ६४ हजार ५५० मिळाली तर शिवसेनेचे कमलाकर दळवी याना ५१ हजार ६७७ मते पडली.त्यावेळी राज्यात सेना-भाजप युती तुटली होती,त्यामुळे भाजपकडून जगदीश धोडी यांना रिंगणात उतरवण्यात आले होते.त्यांना ३० हजार २२८ पडली.या तिहेरी लढतीत कमलाकर दळवी यांचा १२ हजार ८७३ मतांनी पराभव झाला.यावेळीही विजयी उमेदवाराला मतविभागणीचा फायदा झाला.मात्र तसा फायदा लोकसभा निवडणुकीत बविआला होत नाही.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे डॉ.हेमंत सवरा याना १ लाख ४ हजार ४३९,बविआच्या राजेश पाटील यांना ६५ हजार, हजार २९१ तर सेनेच्या ( उबाठा ) भारती कामडी याना ६२ हजार ७०६ मते मिळाली.यंदा बोईसरची जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे बविआ विरुद्ध शिवसेना ( शिंदे गट ) अशी सरळ लढत होऊ शकते.

