दीपक मोहिते,
” न्युजलाईन,”
नियती ही नेहमी चांगल्याला साथ देत असते,
४७ वर्षांपुर्वीबरोबर आजच्या दिवशी, स्वातंत्र्यानंतर प्रथमच,काँग्रेस आणि इंदिरा गांधींचा अत्यंत दारूण पराभव झाला होता.
दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या आवारात १९७७ च्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांना जनता पक्ष आणि आताच्या भाजपच्या तत्कालीन जनसंघाने एक घोषणा तयार केली होती
” काँग्रेसवाला दाखवा आणि शंभर रु.मिळवा,”
त्यावेळी काँग्रेसजनांनी हा अपमान गिळला होता.त्यावेळी युवक काँग्रेस मात्र चांगलीच आक्रमक झाली होती.
दिल्लीच्या मतमोजणीत काँग्रेसचे सारे उमेदवार भरपूर मागे पडले असतांना,बिकट स्थितीतही काँग्रेसचे युवक या घोषणेला आव्हान देत उभे होते,
” हां हां हम है काँग्रेसी, लाओ सौ रूपये,” अशी प्रतिघोषणा देण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
अर्थातच त्यांना शंभर रुपये देण्याचे जनसंघाने औदार्य मात्र दाखवले नाही.
सत्ता गेली होती,आर्थिक बाजू अतिशय हलाखीची होती.संघटनेचे कामकाज चालवण्यासाठी खजिन्यात पुरेसा निधी उपलब्ध नव्हता.अत्यंत केविलवाण्या स्थितीत युवक काँग्रेसच्या नेत्यांवर कामकाज पुढे रेटण्याची पाळी आली होती.
काश्मिरच्या डोडा जिल्ह्यातला तरूण नेता, गुलाम नबी आझाद अनेक दिवस,आठवडे अन् महिने, भोजनाऐवजी केवळ ब्रेडचे तुकडे आणि केळी खाऊन दिल्लीत दिवस काढत होता.रामचंद्र रथ यांना मिळालेल्या सरकारी सदनिकेच्या एकाच खोलीत आझाद आणि पणिक्कर एकत्र रहायचे.भुकेच्या कळा इतक्या तीव्र असत की आझाद यांच्या आतड्यांमध्ये कायमचा आजार जडला.
कालांतराने आझाद यांचा देशाच्या आरोग्य मंत्रीपदापर्यंत राजकीय प्रवास झाला,पण तरूणपणी त्यांचा पोटाला जडलेला विकार,आजही अधूनमधून त्यांना त्रास देत असतो.उत्तम दर्जाचे डाॅक्टर्स देखील तो बरा करू शकले नाहीत.
काँग्रेसचा १९७७ सालचा पराभव लक्षणीय होता.
रायबरेली आणि अमेठीत इंदीराजी आणि संजय गांधी पराभूत झाले होते. उत्तरप्रदेशात लोकसभेचे ८४ मतदारसंघापैकी एकाही जागेवर काँग्रेस उमेदवार विजयी होऊ शकला नव्हता.उत्तर भारतातील सर्वच राज्यात हीच परिस्थिती होती.
काँग्रेसच्या पहिल्याच दारूण पराभवानंतर बहुसंख्य कार्यकर्ते पक्ष सोडून गेले.तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष के.ब्रह्मानंद रेड्डी यांच्यासह काही जेष्ठ काँग्रेस नेत्यांनी १ जाने.१९७८ रोजी काँग्रेस पक्षातून इंदीरा गांधीची हकालपट्टी केली.रेड्डींना त्यावेळी वसंतदादा पाटील, देवकांत बारूआ,सरदार स्वर्णसिंगसारख्या दिग्गज नेत्यांचा पाठिंबा होता.
विद्याचरण शुक्ला, बन्सीलाल,अंबिका सोनी, करणसिंग सोडून गेले होते. एकेकाळी ” इंदीरा इज इंडीया,” सारखी लक्षवेधी घोषणा देणारे देवकांत बारूआ हे देखील इंदीराजींच्या सानिध्यात दूर दूर पर्यंत कुठेही दिसत नव्हते.
गलबत बुडायला लागल्यावर,अथांग सागरात विसाव्यासाठी त्यावर बसलेले पक्षीपण निरोप घेतात,तशा इंदीरा गांधी एकाकी पडल्या होत्या.अशा वेळी एके दिवशी
चरित्रकार डाॅम मोराईस इंदीराजींना भेटायला गेले, शारिरीकदृष्ट्या त्या प्रचंड अशक्त झाल्याचे त्यांना त्यावेळी जाणवले.तरीही बोलतांना इंदीराजींचा चेहरा अतिशय प्रसन्न होता. डाॅमना त्या म्हणाल्या, ” माझ्या खांद्यावरून बरेचसे ओझे कोणीतरी कमी केल्यासारखे मला वाटत आहे.”
लोक पुन्हा काँग्रेसकडे परततील,असे काँग्रेस पक्षातील जेष्ठ सहकारी अरूणा असफअली इंदीराजींना धीर देण्यासाठी अन् त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी म्हणाल्या. तेंव्हा,कधी ? हा प्रश्न त्यांना उत्सुकतेने विचारतांना, काहीशी अगतिकताही इंदीरा गांधीच्या स्वरात होती…
इंदीराजींना राष्ट्रीय राजकारणात सहज परतता येईल,इतपत संधी अथवा सूट देण्याची जनता पक्षाची अजिबात इच्छा नव्हती.
त्यांच्या नेत्यांच्या नसानसात इंदीरा द्वेष भरला होता.शाह आयोगा व्यतिरिक्त,इंदीरा गांधी विरूद्ध डझनभर फौजदारी खटलेही दाखल करण्यात आले होते.संजयला देखील अनेकदा तुरूंगवास भोगावा लागला.मोरारजी देसाईंचे सरकार त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हते.गुप्तचर अधिकाऱ्याचे पथकाने संजय गांधी यांच्यामागे सतत ससेमिरा लावला लावला होता.ते जेथे जायचे तेथे मुद्दाम त्याचा पाठलाग करण्यात येत असे.
अटक झाल्यानंतर इंदीराजी तिहार तुरुंगात असतांना तुरूंगात त्यांना घरचा डबा आणि पाणी घेऊन सोनिया, छोट्या राहूल अथवा प्रियंकाला सोबत घेऊन नेऊन देत असत.
नियतीने आयुष्यात पेरलेल्या चढउतारांना आणि संकटांना गांधी घराणे कशाप्रकारे व किती अपूर्व धाडसाने सामोरे जाते,त्यासाठी आपण सदैव कसे तयार असले पाहिजे.याविषयी आपल्या मुलांना शिक्षण मिळावे, संकटकाळातही गांधी घराण्याचे ऐक्य किती मजबूत आहे,याचे दर्शन जगाला घडावे,असे अनेक हेतू अशा भेटींमधून साध्य होत होते.
इंदीराजी तशा प्रचंडल संयमी होत्या.काँग्रेस अध्यक्ष रेड्डींनी इंदीरा गांधी यांची हकालपट्टी केल्यावर त्यांच्या घरातून बाहेर पडताना बुटासिंगांनी त्यांना सुनावले,एक लक्षात ठेवा, ” इंदीरा म्हणजेच काँग्रेस,” असे ठणकावून सांगितले.
नंतर बुटासिंग यांनी सगळा घटनाक्रम इंदीरा गांधी यांना सांगून आपण रेड्डींना कशी जागा दाखवली,हे सांगू लागले.तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता,असभ्य भाषा वापरल्याबद्दल त्यांची इंदीरा गांधी यांनी खरडपट्टी काढली,त्या म्हणाल्या,विसंवाद कितीही पराकोटीला गेला तरी एक गोष्ट विसरू नका,काहीही झाले तरी ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
दिल्लीचा माळवणकर सभागृहात २ जाने.१९७८ रोजी एका मेळाव्यात इंदीराजींनी घोषणा केली की,
इंडियन नॅशनल काँग्रेस (आय) या नव्या पक्षाची मी स्थापना करीत आहे.
त्यांच्या नवीन पक्षाला स्वतःचे कार्यालयही नव्हते. त्याच वेळेस निवडणूक आयोगाने पक्षाच्या निवडणूक चिन्हासाठी, हत्ती,सायकल आणि हाताचा पंजा,असे तीन पर्याय समोर ठेवले होते.नरसिंहराव, इंदीराजींनी हाताचा पंजा हे चिन्ह निश्चित केले.
सत्तेवर नसल्याने आणि नव्यानेच पक्षाची सुरूवात होत असल्याने, मुख्यालयाची तिजोरी रिकामी होती.खासदार आणि बरेच नेते १०० किंवा त्याहून थोडी अधिक देणगी देत असत,.काही नेते अनिच्छेने दहा,वीस रू. द्यायचे.या सर्व देणग्या बुटासिंग अत्यंत नम्रतेने आणि आनंदाने स्विकारायचे.मुख्यालयात आलेले काँग्रेस कार्यकर्ते उपाशी दिसले तर बुटासिंग त्यांच्या भोजनासाठी तिजोरीत पुरेसे पैसे नसले तर हळूच गुरूद्वारा बांगला साहीबला पायी चालत जायचे आणि तेथे असलेल्या लंगरमधून उपाशी कार्यकर्त्यांसाठी खाद्य पदार्थ आणायचे.
पंडीत नेहरूंच्या मंत्रीमंडळातील आणि लोकसभेवर तीनदा निवडून आलेले,सुभाषचंद्र बोस यांचे तत्कालीन सहकारी, शिस्तप्रिय जनरल शहानवाज खान इंदीराजींच्या आग्रहास्तव मुख्यालयात पदाधिकारी, कार्यकर्तेंच्या तरूण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी यायचे.
सुरूवातीला इंदीराजी निराश होत्या मात्र वर्ष १९७८ उजाडले तोपर्यंत पूर्वीचा उत्साह आणि जिद्द अतिशय वेगाने इंदीरा गांधींच्या अंगात संचारली.
अ.भा.काँग्रेस महासमितिच्या सदस्यांपुढे बोलतांना त्या म्हणाल्या…
मी विश्वासाने सांगू
इच्छिते,विद्यमान सरकारचा कार्यकाल पूर्ण होईपर्यंत,ते सत्तेतून घालवण्याचा काँग्रेसचा कोणताही इरादा नाही.मात्र आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर या सरकारची वृत्ती बदलण्यास आपण त्यांना भाग पाडू शकु.हरिजनांच्या पाठीशी ठामपणे आपण उभे राहीलो तर कोणामध्ये इतकी हिंमत आहे की त्यांची घरे आणि झोपड्या ते जाळतील ? अल्पसंख्यांकाच्या मागे खंबीरपणे आपण उभे राहिलो तर कोणाची बिशाद आहे की ते त्यांचा छळ करू शकतील ?
त्यानंतर देशात कुठेही धार्मिक,जातीय तणाव निर्माण झाल्याचे समजल्यावर काँग्रेसतर्फे तेथे तातडीने पोहोचून त्यात सकारात्मक कृतीने हस्तक्षेप करता येईल, राष्ट्रीय स्तरावर शोषित, वंचितांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढेल,यासाठी इंदीराजींनी पक्षात तशी व्यवस्था कार्यान्वित केली.
पुढे,स्वकर्तृत्त्वाने जनता सरकार अकाली मृत्यू पावल्यावर मध्यावधी निवडणूकांची घोषणा झाली.निवडणूकीची पुर्वतयारी करतांना बुटासिंग,अंतुले,मुपनार, प्रणव मुखर्जी आणि सहकाऱ्यानी दररोज २० तासांपेक्षाही अधिक काळ मेहनत घेतली.
यावेळी तरूणांना जास्त संख्येने तिकीटे देताना राज्या राज्यात काँग्रेसच्या बहुतांश परंपरागत सुभेदारांच्या प्रभावाचे पंख छाटण्याकडे विशेष लक्ष दिले गेले.
इंदीरा गांधी आणि संजयने या कालखंडात प्रवासाचा विक्रम केला. दररोज ४० हजार कि.मी.पेक्षाही जास्त उड्डाणे करीत सारा देश पालथा घातला.दोघांनी दिवसाकाठी पंधरा ते वीस जाहीर सभा संबोधित करण्याचा धडाका लावला.
हे वर्णन करतांना न्युज वीकने म्हटले,अंगावर खादीची साडी आणि पायात धुळीत माखलेले सँडल्स चढवलेली एक ६२ वर्षे वयाची चालती बोलती दंतकथा,जीच्या राजकीय झंझावातापुढे जनता पक्षाचे नेते टिकाव धरणे अवघडच आहे.
देशातील १५० कोटी जनतेतल्या प्रत्येक चौथ्या मतदाराने किमानपक्षी आपल्याला पहावे,अथवा प्रत्यक्ष ऐकावे,यासाठी केलेल्या प्रयत्नात इंदीराजी यशस्वी ठरल्या.
त्याकाळी २४ तास चालणाऱ्या वृत्तवाहीन्या नव्हत्या,दूरसंचाराची अत्याधुनिक साधनेही नव्हती की देशाच्या कानाकोपऱ्यात वृत्तपत्रेदेखील पोहोचत नव्हती,अशा काळात,आई आणि मुलाने झंझावती प्रचाराचे अतुलनीय शिखर सर करून दाखवले.
पुढे निकाल काय लागणार ते स्पष्टच होते.
काळ बदलला पण इतिहासापासून शिकण्यासारखे खुप काही आहे.शेवटी कोणताच पराभव अंतिम नसतो. बदल हा तर सृष्टीचाच नियम आहे.
नियतीच्या चंचलतेचा गुणधर्म कोणा एका मिजासखोर,आत्ममग्न नेत्याला अपवाद तर मुळीच नाही.
हा इतिहास धर्माचा बेरजा, वजाबाक्या करून आणि काल परवा जन्माला आलेल्या उथळ भोंदू पक्षांचा नसून दैदीप्यमान इतिहास,परंपरा असणाऱ्या आणि राखेतून भरारी घेणार्या मुर्तिमंत फिनिक्सचा आहे.
आपली जडणघडण ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या मुशीतून झाली आहे,तिच्यासोबतचे ऋणानुबंधांवर पुन्हा एकदा उजेड टाकून बळकट करण्याची आणि धर्मांध शक्तींना त्यांची जागा दाखवण्याची हीच वेळ आहे.

