दीपक मोहिते,
सूर्यातीर, विधानसभा रणसंग्राम-२०२४,
२) १२९-विक्रमगड विधानसभा मतदारसंघ,अनु.ज.
विक्रमगडवासीय सुनील भुसारा यांना पुन्हा संधी देतील का ?
२६ जाने.२००२ रोजी विक्रमगड तालुक्याची निर्मिती झाली.हा तालुका जंगल व डोंगरदऱ्याने व्यापलेला असल्यामुळे गेल्या २३ वर्षात अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत.स्थानिक भूमीपुत्रांचे शेती हे रोजगाराचे एकमेव साधन आहे.दरवर्षी या तालुक्यात सरासरी २८०० ते ३००० मि.मी.पाऊस पडतो.या तालुक्यात एकूण ९४ महसूल गावे असून लोकसंख्या जवळपास १ लाख ५२ हजाराच्या आसपास आहे.भातशेती सोबत डोंगराळ भागात नागली व वरई इ.पिके घेण्यात येतात.पूर्वी हा तालुका कुडाण या नावाने ओळखले जात असे १० डिसें.१९४७ रोजी त्याचे विक्रमगड असे नामकरण करण्यात आले.तालुक्यात वारली,कुणबी,महादेव कोळी,ठाकूर,मल्हार कोळी,कातकरी व ढोरकोळी,अशा विविध जाती-जमातीचे लोक राहतात.गेल्या दहा वर्षात या तालुक्यातील अनेक गावे रस्त्यांनी जोडली गेली आहेत,मात्र अनेक पाड्यावर अद्याप पायवाटाच आहेत.त्यामुळे लोकांना प्रवासासाठी बैलगाड्या,काळी-पिवळी जिप्स,ट्रक्स व टेम्पोचा आधार घ्यावा लागतो.तालुक्यात पिंजाळ,सूर्या,देहर्जे व राखाड्या,या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्यामुळे पाण्याची कमतरता नाही.
अशा या विक्रमगड
मतदारसंघात गेल्या निवडणुकीत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली.त्या पक्षाचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सरळ लढतीत २१ हजार ३९९ मतांनी भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांचा आश्चर्यकारकरित्या पराभव केला.या दोघांमध्ये झालेल्या सरळ लढतीमध्ये सुनील भुसारा यांना ८८ हजार ४२५ मते मिळाली तर डॉ.हेमंत सवरा याना ६७ हजार २६ मतांचा पल्ला गाठता आला.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपचे विष्णू सवरा यांनी शिवसेनेचे प्रकाश निकम यांचा ३ हजार ८४५ मतांनी पराभव केला होता.यावेळी सरळ लढत होऊन विष्णू सवरा याना ४० हजार २०१ तर प्रकाश निकम यांना ३६ हजार ३५६ मते पडली.२००९ साली भाजपचे ऍड. चिंतामण वनगा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत भुसारा यांचा ५ हजार ३२ मतांनी पराभव केला होता.या लढतीत वनगा यांना ४७ हजार ३७१ तर चंद्रकांत भुसारा यांना ४२ हजार ३३९ मते मिळाली.या मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य असे की येथील मतदार सलग दुसऱ्यांदा कोणालाही संधी देत नाहीत.त्यामुळे यावेळी ते ही परंपरा कायम ठेवतात का ? हे पाहायला लागेल.
यापूर्वी झालेल्या निवडणुका भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी युतीच्या माध्यमातून लढवल्या होत्या.पण आता त्यांची युती तुटल्यामुळे तसेच राज्यातील राजकीय समिकरणे बदलल्यामुळे येथे महायुती व महाविकास आघाडी यामध्ये लढत होईल.या निवडणुकीत ही जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे,तशी ती गेल्यास संतोष जनाठे हे महाविकास आघाडीच्या सुनील भुसारा यांच्याशी दोन हात करतील.
क्रमशः

