दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
जरांगे पाटील यांची दबक्या पावलाने महायुतीला धक्का देण्याची रणनिती,
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा व ओबीसी समाजाच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.ओबीसी नेत्यानी या निवडणुका लढवणार कि नाही,याविषयी अद्याप तोंड उघडलेले नाही.तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी मात्र मराठा समाजाच्या तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी चालवली आहे.त्यांच्या उमेदवारांना या निवडणुकीत फारसे यश मिळणार नसले तरी त्यांचे उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभुत ठरू शकतात.उत्तर प्रदेशचे नेते दिवंगत कांशीराम यांचे निवडणुकीचे एक सूत्र होते.” पहिल्यांदा हरायचे,दुसऱ्यावेळी हरवायचे व तिसऱ्यावेळी जिंकायचे,” जरांगे यांनीही सध्या हेच सूत्र स्विकारले आहे.पण त्यांना जिंकायचे नाही,त्यांना सत्ताधाऱ्याना केवळ पाडण्यात रस आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मराठवाड्यात चांगलाच फटका बसला होता.पंकजा मुंडे व रावसाहेब दानवे,हे भाजपचे दोन मोहरे धारातीर्थी पडले होते.
आपल्या रणनितीला मिळालेले यश लक्षात घेऊन जरांगे पाटील आता जिल्ह्याजिल्ह्यात फिरू लागले आहेत.प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता,येत्या विधानसभा निवडणुकीतही जरांगे यांची जादू चालेल असे वाटते.भाजप व महायुतीमधील घटक पक्षाचे अनेक पदाधिकारी जरांगे यांच्या संपर्कात आहेत.नाराज लाडक्या बहिणी,महा.लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन,राज्याच्या अनेक भागात होत असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन,नाराज ओबीसी,मराठा,धनगर समाज,एसटी कामगारांचे आंदोलन व विरोधकांकडून होणारा उद्याचा ” महाराष्ट्र बंद,” इ.कारणांमुळे महायुतीचे सरकार सध्या प्रचंड अडचणीत आले आहे.अशा बिकट परिस्थितीत बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाने महायुती सरकारची लक्तरे वेशीवर टांगली गेली.प.महाराष्ट्र व मराठवाडा विभागात मराठा समाज मोठ्या संख्येने राहतो.त्यामुळे महायुतीला या दोन विभागात धोका संभवतो.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या मराठ्यांच्या आरक्षणावर चकार शब्द बोलत नाहीत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याविषयी मौन बाळगून आहेत.विदर्भातही अनेक जिल्ह्यात मराठ्यांची लोकसंख्या लक्षणीय आहे.सत्ताधाऱ्यांना दणका देण्यासाठी जरांगे पाटील यांनी महायुतीला अगदी शांतपणे खिंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.पूर्वीसारखे उपोषण,आंदोलन करणे,सत्ताधारी लोकांवर तोंडसुख घेणे,इ.प्रकारांना आळा घातला असून,त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात चितपट करण्यासाठी त्यांनी रणनिती आखली आहे.

