दीपक मोहिते,
सूर्यातीर रणसंग्राम,
पालघर जिल्हा ; पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर,
एकेकाळी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेला हा परिसर कालांतराने पालघर लोकसभा ( अनु.ज. ) म्हणून नावारूपाला आला.या मतदारसंघात वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता पालघर,डहाणू,मोखाडा,
बोईसर व विक्रमगड हे पाचही मतदारसंघ अनु.जमातीसाठी आरक्षित आहेत.वसई,नालासोपारा,पालघर,बोईसर व डहाणू हे पाच तालुके रेल्वे व रस्त्यांनी जोडले गेल्यामुळे गेल्या वीस वर्षांत या परिसरात नागरीकरणाला प्रचंड वेग आला.नागरीकरणाच्या प्रचंड वेगामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांचा अक्षरशः बोजवारा उडाला.पाणी,आरोग्य,शिक्षण,पर्यावरण,प्रदूषण,वैद्यकीय सेवा,रस्ते,वीज व अन्य समस्यांनी अक्राळ विक्राळ रूप धारण केले.तर दुसरीकडे डोंगरी विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा व विक्रमगड या तालुक्यातील नागरिकांना अश्मयुगातील जीवन जगावे लागत
आहे.चालायला धड रस्ते नाहीत,प्यायला पाणी पाणी नाही,हाताला काम नाही,अशा कारणामुळे दरवर्षी हजारो आदिवासी रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत असतात.
१९७० च्या दशकात तत्कालीन काँग्रेस सरकारने तारापूर येथे महा.औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीची स्थापना केली.पण आज ही औद्योगिक वसाहत आचके देऊ लागली आहे.सवलती उपटून अनेक उद्योजकांचे पळ काढणे,महामंडळ अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा,स्थानिक राजकीय पक्षाच्या नेत्यांचे ओरबाडून खाणे,अशा गैरप्रकारामुळे ही वसाहत आता मृत्यूशय्येवर आडवी झाली आहे.सरकारने या सर्व गैरप्रकाराकडे कायम दुर्लक्ष केले,त्यामुळे ही औद्योगिक वसाहत आता इतिहासजमा होऊ लागली आहे.या औद्योगिक क्षेत्राला रासायनिक क्षेत्र म्हणून जाहीर करताना महामंडळाने पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण संदर्भांतील कायद्याची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याकडे लक्ष देण्याची गरज होती.या परिसरात असलेले महा.प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हे असून नसल्यासारखे आहे.जे कायम पाकीट संस्कृती मध्ये मग्न असते.त्यामुळे पालघर तालुक्यात पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील बनत चालला आहे.त्याचा विपरीत परिणाम मत्स्यउत्पादनावर जाणवू लागला आहे.सरकारने वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात पर्यावरणाची समस्या आ वासून उभी ठाकणार आहे.
अशा परिस्थितीमध्ये आता विधानसभा निवडणुका होत आहेत.आजवर झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये या गंभीर विषयांची एकाही राजकीय पक्षाने दखल घेतली नाही,कारण हे सारे राजकीय पक्ष खाबूगिरी करणाऱ्या शृंखलेची एक कडी आहेत.

