दीपक मोहिते,
सूर्यातीर,विधानसभा रणसंग्राम-२०२४,
१) १२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ -अनु.ज.
डहाणू विधानसभा ; भाजप – मार्क्स.कम्यु.अशीच लढत होणार,
१२८-डहाणू विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेला हा मतदारसंघ आदिवासीबहुल आहे.पूर्वी हा मतदारसंघ तलासरी विधानसभा म्हणून ओळखला जायचा,२००९ साली झालेल्या मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये तलासरीचा परिसर डहाणू मतदारसंघाला जोडून नवीन डहाणू विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.पूर्वीच्या तलासरी विधानसभा मतदारसंघावर मार्क्स.कम्यु.पक्षाचे कायम वर्चस्व राहिले.त्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने ९० च्या दशकात मार्क्स.कम्यु.पक्षाशी जोरदार संघर्ष केला.भाजपचे नेते कै. गोपीनाथ मुंडे यांचे या मतदारसंघावर कायम लक्ष असायचे.मार्क्स.कम्यु.व भाजपच्या कार्यकर्त्यात अनेकदा तुफान हाणामाऱ्या झाल्या.पण अनेक वर्षे भाजपची डाळ शिजू शकली नाही.२०१४ साली मात्र भाजपने या विधानसभा मतदारसंघात मुसंडी मारली.भाजपचे पास्कल धनारे यांनी मार्क्स.कम्यु.पक्षाचे मंगत बारक्या वंशा यांचा तब्बल १६ हजार ७०० मतांनी पराभव केला.त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत धनारे याना ४४ हजार ८४९ तर वंशा यांना २८ हजार १४९ मते पडली.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काशिनाथ चौधरी यांना २७ हजार ९६३ मते मिळाली व ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची दयनीय अवस्था झाली.त्यांच्या रमेश पदमाले यांना केवळ १४ हजार १६६ मतांवर समाधान मानावे लागले.त्यानंतर २०१४ साली मार्क्स.कम्यु.पक्षाने ही जागा पुन्हा भाजपकडून खेचून घेतली.त्यांच्या विनोद निकोले यांनी पास्कल धनारे यांचा ४ हजार ७०७ मतांनी पराभव केला.या निवडणुकीत विनोद निकोले यांना ७२ हजार ११४ मते मिळाली तर पास्कल धनारे यांना ६७ हजार ४०७ चा पल्ला गाठता आला.अशा सर्व राजकीय परिस्थितीमध्ये येत्या डिसें., महिन्यात विधानसभा निवडणुक होत आहेत.या विधानसभा मतदारसंघात यंदा भाजप व मार्क्स.कम्यु.अशी सरळ लढत होणार आहे.मार्क्स.कम्यु.पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्यामुळे ही जागा त्यांच्या वाट्याला जाणार आहे.या मतदारसंघातील डहाणू व तलासरी,या दोन्ही परिसरात गेल्या काही वर्षांपासून नागरिकरणाला प्रचंड वेग आला आहे.डहाणू येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येत असतात.तर वाढते नागरीकरण लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने तलासरी येथे नगरपंचायत स्थापन केली.पण अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत.महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या या गावात काही प्रमाणात उद्योगवाढीला वेग आला आहे,पण उद्योग क्षेत्राला आवश्यक नागरी सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत.त्यामुळे उद्योजकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या भारती कामडी ( शिवसेना उबाठा गट ) याना भाजपच्या डॉ.हेमंत सवरा याना ८८२ मतांनी पिछाडीवर ढकलले.या लढतीत भारती कामडी यांना ८३ हजार ८८२ तर भाजपच्या डॉ.सवरा याना ८३ हजार मते मिळाली.बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांना केवळ १२ हजार ७९२ मतांवर समाधान मानावे लागले.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप व मार्क्स.कम्यु.अशीच लढत होण्याची शक्यता आहे.
क्रमशः

