दीपक मोहिते,
मुख्यमंत्री शिंदे यांचे ताळतंत्र सुटले,
बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बेताल व्यक्तव्य केले,त्यामुळे आता आगीत तेल ओतले गेले आहे.वास्तविक या संवेदनशील विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे होते.आपला एक सहकारी आंदोलकांवर बेफाम आरोप करत असताना त्यांनी आवर घालण्याऐवजी त्याची री ओढल्यामुळे आंदोलकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ते काय म्हणाले ते पहा,” या आंदोलनात स्थानिक नागरिक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते.अनेक आंदोलकांना बाहेरुन गाड्या भरून आणले होते,या सर्व घडामोडीमागे राजकीय प्रेरणा आहे,असा हास्यास्पद दावा केला.
पीडित मुलीच्या पालकांना बदलापूर पोलीस बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं,त्या मुलीच्या गरोदर आईच्या अंगात १०२ ताप असताना त्यांना तब्बल १२ तास पोलीस ठाण्यात तिष्ठत ठेवले,याचा खरतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांना जाब विचारायला हवा होता,तो न विचारता त्यांनी विरोधी पक्षावर तोंडसुख घेण्यात धन्यता मानली.वास्तविक त्यांच्या ठाण्यापासून अवघ्या अर्ध्या तासांवर असलेल्या बदलापूरला त्यांनी तातडीने भेट द्यायला हवी होती.पण ते व ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे,त्या गृहमंत्री फडणवीस या दोघांनी घटनास्थळी तातडीने दाखल व्हायला हवे होते.पण तसं न करता ते विरोधकांना लक्ष्य करत राहिले.या दोघाना आपण संविधानिक पदावर बसलो आहोत,नागरिकांच्या सुरक्षिततेची आपल्यावर जबाबदारी आहे,याचा जर विसर पडत असेल तर त्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे द्यायला हवेत.त्यांचे आणखी एक सहकारी अजित पवार हे गुलाबी जाकीट व गुलाबी गाड्या उधळत निवडणुकीच्या प्रचारात भटकत आहेत.त्यांनी सात दिवसाने या घटनेतील आरोपींना फाशी दिली पाहिजे,अशी प्रतिक्रिया दिली.अशी माणसे या पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असावी,हे तुमचे आमचे खरं दुःख आहे.मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांची समजूत काढण्यासाठी त्यांचे दूत म्हणून वावरणाऱ्या गिरीश महाजन या वादग्रस्त मंत्र्याला आंदोलनस्थळी पाचारण केले.त्यांना पाहताच आंदोलक चवताळले व त्यांनी दगडफेक सुरू केली.गिरीश महाजन यांचे येथे आगमन झाल्यामुळे जमाव अनावर झाला व पुढचे महाभारत घडले.संध्याकाळी पाचच्या सुमारास पोलिसांनी जमावावर अमानुष लाठीहल्ला करण्यास सुरुवात केली.या लाठीहल्ल्यामुळे जमाव पांगला,पण लोकांच्या मनावरील जखमा अधिक गडद झाल्या.” याच लाडक्या बहिणी,” आता गाजावाजा करणाऱ्या सरकारला दिवसाढवळ्या आकाशातील तारे दाखवणार आहेत.बहिणी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आक्रोश करत असताना शिंदे,फडणवीस व पवार या तिघांनी त्यांच्यावर लाठ्याची बरसात केली ती निंदनीय असून त्याचे समर्थन कदापी होऊ शकणार नाही.या घटनेमुळे व्यथित झालेल्या या लाडक्या बहिणी येत्या विधानसभा निवडणुकीत या महाभागांना नक्कीच वनवासात पाठवतील,असे वाटते.

