दीपक मोहिते,
भयावह वास्तव,
मराठी पत्रकारितेच्या घसरणीला आपणच जबाबदार,
” जेफप्लस,” यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्यंगचित्राने प्रसिद्धी माध्यमावर सध्या धुमाकूळ घातला आहे.एक गाढव कागदावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे,असे या व्यंगचित्रात दाखवण्या आले आहे.गाढवाच्या डोक्याऐवजी एक मानवी हात आहे,जो पेन धरून लिहीत आहे.हे व्यंगचित्र आजच्या मराठी पत्रकारितेची अवस्था कशी झाली आहे,यावर प्रकाश टाकते.
आज मराठी पत्रकारितेत अर्धवट माहिती असलेल्या संपादक व पत्रकारांची संख्या सतत वाढत आहे.हे पत्रकार कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता,अर्धवट तथ्य आणि वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या देत नाहीत.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे.
पत्रकारितेचे ओळखपत्र घातल्याने कोणी पत्रकार होत नाही.संपादक व पत्रकार होण्यासाठी उत्तम लेखन कौशल्य आणि विषयांचे सखोल ज्ञान आवश्यक आहे.पत्रकारांनी समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे,अपेक्षित आहे.परंतु,आज अनेक संपादक व पत्रकार हे केवळ अपूर्ण माहिती देत असतात.
या समस्येचे एक प्रमुख कारण म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला मिळणारे अपुरे प्रशिक्षण व इच्छाशक्तीचा अभाव अशी दोन कारणे आहेत.शाळा आणि महाविद्यालये ही विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञान देत असतात्,त्यांना पत्रकारितेची मूल्ये आणि तत्त्वे शिकवणे ही जबाबदारी संपादक व वृत्तसंपादक यांची आहे.पण ही महत्वाची जबाबदारी ते पार पाडत नाहीत.अनेक संपादक तर ऑफिसमध्ये आल्यानंतर एकदा केबिनमध्ये शिरले की आपल्या केबिनमधून बाहेरच पडत नाहीत.पूर्वी संपादक व वृत्तसंपादक ऑपरेटरच्या मागे बसून बातम्या तपासत असत किंवा बातम्यांची प्रिंटआऊट केबिनमधून मागवून ती तपासत असत,आता अशाप्रकारच्या कामांना मूठमाती देण्यात आली आहे.जुन्या मंडळींनी जी व्यवस्था निर्माण केली होती ती व्यवस्था आता इतिहासजमा झाली आहे.केबिनमध्ये बसून चार ते पाच ए-फोर पाने खरडली की आपले काम संपले,असा आधुनिक विचार उराशी बाळगणाऱ्या संपादकांची एक शृंखलाच तयार झाली आहे.त्यामुळे डेस्कवरील स्टाफ देखील बेफिकीर होत असल्याचे पाहायला मिळते.या अशा भयावह परिस्थितीमुळे हल्ली बातम्याचा बट्ट्याबोळ झाला आहे.मध्यंतरी एका पत्रकाराने एक बातमी पाठवली होती,त्या बातमीचे हेडिंग होते ” एका शेतात मृतावस्थेत प्रेत सापडले,” बातमी डेस्कवरून एडिट होऊन छापून देखील आली.पण डेस्कवरील उपसंपादकानी ” प्रेत हे कधी जिवंतपणी सापडते का ? हे लक्षात घ्यायला हवं होतं.मुळात त्याचे हेडिंग असं असायला हवं होतं ” शेतात प्रेत सापडले,” पण त्या उपसंपादकाने ती तशीच पाठवली तर वृत्तसंपादक व संपादकानी त्या बातमीकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती तशीच छापून आली.वास्तविक संपादकांनी प्रत्येक बातमीचे हेडिंग आपल्या नजरेखालून घातली पाहिजे.हल्ली अनेक दैनिकाच्या बातम्यांमध्ये एका वाक्यात पंधरा ते सोळा शब्द असणे,इन्ट्रो मालगाडीसारखा लांबलचक असणे व इन्ट्रोमध्येच बातमीचे संपूर्ण सार असणे,असे प्रकार वाढीला लागले आहेत.केवळ काम खेचून नेणे,यावर संपादकांचा भर असतो.हल्ली काही दैनिकाचा अपवाद वगळता बहुतांश दैनिकांतील बातम्यांचा दर्जा सुमार असतो.त्यास संपादकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.वास्तविक संपादकांनी आपल्या दैनिकात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे.आपले लेख लिहून झाले कि आपले काम संपले ही वृत्ती,दैनिकाला मारक आहे.अशा सर्व परिस्थितीमुळे वृत्तपत्र व्यवसायाची प्रचंड घसरण सुरू झाली आहे.कोरोनामुळे तर या व्यवसायाचे कंबरडे पार मोडून पडले असताना व्यवस्थेमध्ये अशाप्रकारचा गोंधळ निर्माण होणे,हे अत्यंत घातक आहे.हे संपादकांना कळायला हवे.सध्याचे युग हे इलेक्ट्रॉनिक,युट्युब चॅनेल्स,डिजिटल व न्यूज पोर्टलचे आहे.लोकांना या माध्यमांचे प्रचंड आकर्षण आहे.त्यामुळे तरुणवर्ग सहसा प्रिंट मिडियाकडे वळत नाही.रामप्रहरी स्टॉलवर जाऊन पेपर विकत घेणारा वाचक आता स्टॉलकडे फिरकत नाही.एकेकाळी मुंबई व ठाणे जिल्ह्यात १५ हजार पेपर स्टॉल होते,आज ती संख्या ५ हजारावर आली आहे.इंटरनेटमुळे ही दैनावस्था झाली असली तरी जुनेजाणते वाचक आजही दैनिकाला पसंती देत असतात.मात्र हल्लीच्या दैनिकांतील बातम्यांचा दर्जा खालावल्याची खंत ते व्यक्त करत असतात.त्यामुळे मीडिया संस्थांनीही आपल्या पत्रकारांना सतत प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या कामाचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे.केवळ बातमी देण्याच्या स्पर्धेत,संपादक व पत्रकारांनी सत्यता आणि निष्पक्षता या मूल्यांशी तडजोड करता कामा नये.
मराठी पत्रकारितेला पुन्हा एकदा तिचे गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल,तर आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.अर्ध्या हळकुंडातील पत्रकारितेला आळा घालून,खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिबिंब दाखवणारी पत्रकारिता निर्माण करण्याची गरज आहे.
या चित्रात दाखवल्याप्रमाणे, जर आपण आपली पत्रकारिता सुधारण्यात अयशस्वी ठरलो,तर आपण केवळ गाढवाप्रमाणेच राहू, जे केवळ लिहिण्याचा आविर्भाव करत आहेत, परंतु प्रत्यक्षात समाजाचे प्रबोधन होईल अशा विषयावर काहीही अर्थपूर्ण लिहित नाहीत.

