दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
रामदास कदम यांचे ” हात दाखवून अवलक्षण,”
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण या दोघामध्ये चांगलीच जुंपली आहे.रामदास कदम यांनी चव्हाण यांचा राजीनामा घ्या,अशी थेट मागणी केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला असून युतीमध्ये असताना अशाप्रकारची टीका जाहीरपणे करणे योग्य नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.तर रविंद्र चव्हाण यांनी तोंड सांभाळून बोला अन्यथा थोबाड फोडू,असा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या घटक पक्षात तू तू मै मै सुरू झाली आहे.अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणे,मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांमध्ये कलगीतुरा रंगणे,यामुळे महायुतीची वाटचाल काट्याकुट्यानी भरलेल्या रस्त्यावरून होणार आहे.अजित पवार गटाचे कार्यकर्ते बॅनरवर अजित पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचे फोटो न लावत नाहीत तसेच बॅनरवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,” असा उल्लेख न करता ” ” माझी लाडकी बहीण योजना,” करत असल्यामुळे एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा या परिस्थितीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये सध्या सुरु असलेला अंतर्गत वाद उफाळून वर येण्याची शक्यता आहे.शिंदे व पवार गटात सध्या जे काही चालले आहे,ते भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे.त्यामुळे भाजप काही काळ प्रेक्षकाच्या भूमिकेत होता.मात्र दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अचानकपणे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांना लक्ष्य केल्यामुळे भाजप सावध झाला.रविंद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आहेत.त्यामुळे पक्षीय घडामोडीवर सहसा रिऍक्ट न होणारे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाच्या या नेत्याला जाहीरपणे कानपिचक्या दिल्या.देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे रामदास कदम यांचे चिरंजीव आ.योगेश कदम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला दगाफटका होईल,अशा भितीमुळे आता सारवासारव सुरू केली आहे.पण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय होतील,असे वाटते.

