दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
लाडक्या बहिणी,लबाड भावंडाना ओवाळतील असे वाटत नाही…
राज्यात ” मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी,” योजनेचा सध्या प्रचंड डंका पिटण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,हे तिघे राज्यातील इतर सर्व प्रश्न संपल्यात जमा असल्याच्या आवेशात या योजनेच्या प्रचारात उतरले आहेत.ही योजना पुढेही चालू राहणार,उलट बहिणींना मिळणाऱ्या रकमेत आणखी वाढ होणार आहे,मात्र त्यासाठी बहिणींनी आम्हाला पुन्हा संधी दिली पाहिजे,बटन दाबले पाहिजे,असे कोकलत सुटले आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी तर बहिणीच्या हिताच्या आड येणाऱ्यांना जोडा दाखवा,असे आवाहन केले.एक मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर येऊन अशाप्रकारचे बेलगाम वक्तव्य करतो,हे राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.तर फडणवीस हे ” बहिणींच्या अर्जावर विरोधकांनी बहिणीच्या अर्जावर भावाचे फोटो लावले,काही अर्जावर वाहनाचे फोटो लावल्यामुळे अनेक बहिणीचे अर्ज बाद झाल्याचा ” हास्यास्पद आरोप केला.त्यांचे हे वागणे त्यांच्या स्वभावाला अनुरूप असेच आहे.” खोटं बोल पण रेटून बोल,” या त्यांच्या ” फेक नेरेटिव्ह,” पसरवण्याच्या तंत्राला ते धरून आहे.दुसरीकडे हेच फडणवीस ” विरोधक हे फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत,” असा धादांत आरोप करायलाही विसरत नाहीत.
त्याचे आणखी एक साथीदार सध्या गुलाबी जाकीट मिरवत आमच्या ” लाडक्या बहिणी,” चा सूर आळवत फिरू लागले आहेत.आपल्या बहिणीला मातीत गाडायला निघालेल्या या भावाला बहिणीनेच आकाशातील तारे दाखवले.तो भाऊ आता बहिणीच्या विरोधात निवडणूक लढवायला नको होती,ती माझी चूक होती असे सांगत सुटला आहे.जो आपल्या बहिणीचा होऊ शकत नाही,तो आपला भाऊ कसा होईल ? असा विचार या लाडक्या बहिणीच्या मनात आला तर पुन्हा लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होईल,अशा भितीतून त्याना अशी उपरती झाली असावी,असे समजायला हरकत नाही.या तिघांना खा.सुप्रिया सुळे यांनी ” या भावांना बहीण-भावांचे प्रेम काय असते ? हे कळलेच नाही,” या एका वाक्यात तिघांचा क्लीनबोल्ड उडवला आहे.उबाठा गटाचे खा.संजय राऊत व खा.सुप्रिया सुळे या दोघांनी या योजनेला कधीही विरोध केला नाही,पण या योजनेआडून तीन इंजिनचे हे सरकार ” अशी ही बनवाबनवी,” करत असल्याचे पाहून जबरदस्त हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे.या दोघांच्या हल्ल्यामुळे महायुतीचे हे तीन नेते भितीच्या सावटाखाली आले आहेत.सरकारच्या या अशा बनवाबनवीमुळे या लाडक्या बहिणी या लबाड भावंडांना येत्या विधानसभा निवडणुकीत ओवाळतील,असे वाटत नाही.

