दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
यांना बहीण-भावाचं नातंच कळले नाही,
काल महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला.या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.हा मेळावा १०० % यशस्वी झाला.या मेळाव्यात वक्त्यांनी केलेली भाषणे अप्रतिम अशी होती.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खा.सुप्रिया सुळे यांनी केलेली भाषणे तर इतिहासात नोंद करण्याजोगी होती.त्यांच्या भाषणाला उपस्थित कार्यकर्त्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला.महाविकास आघाडीची एकजूट ही महायुतीच्या नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार याचे संकेत या मेळाव्यातून मिळाले आहेत.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने मेळाव्याला सुरुवात झाली.ते आपल्या भाषणात म्हणाले,दिल्लीतून येणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र कदापी लुटू देणार नाही.लोकसभा निवडणुकीत आपण त्यांना धूळ चारली,विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होणार आहे.आमच्यामध्ये भांडण लावण्याचे सध्या प्रकार सुरू आहेत.मुख्यमंत्री कोण ? यावरून आमच्या मध्ये स्पर्धा सुरू असल्याचे सांगत दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.मी आज आमचे नेते शरद पवार व पृथ्वीराज चव्हाण यांना सांगतो,मला मुख्यमंत्री होण्यात बिलकुल स्वारस्य नाही,तुम्ही जे काही ठरवाल,ते आम्हाला मान्य असेल.त्यानंतर खा.सुप्रिया सुळे यांनी लाडक्या बहिणी योजनेबाबत महायुतीच्या नेत्यांनी बहिणींना धमक्या देणे बंद करावे.आशीर्वाद न दिल्यास पैसे काढून घेऊ,अशी धमकी देणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की पैसे काढून बघच,अरे तुम्हाला बहीण-भावाचं नातं कधीच कळलं नाही.धमक्या कसल्या देता ? खा.संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले,ते आपल्या भाषणात म्हणाले,सरडा आता गुलाबी रंगाचा झाला आहे.सरडा हा सतत रंग बदलत असतो.त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
या मेळाव्यात शरद पवार,नाना पटोले,वर्षा गायकवाड,जयंत पाटील,आदित्य ठाकरे व बाळासाहेब थोरात यांची भाषणे झाली.मेळाव्याला मिळालेले अभूतपूर्व यशामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

