दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नबाब मलिक अजित पवार गटातच, महायुती अडचणीत येणार,
काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) कोअर कमिटीची बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकीला वादग्रस्त नेते नबाब मलिक आवर्जून उपस्थित होते.ते बैठक संपल्यानंतर रात्री उशिरा दीड वाजता अजित पवार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले.त्यामुळे नबाब मलिक हे अजित पवार गटातच आहेत,यावर एकप्रकारे शिक्केमोर्तब झाले आहे.
कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना समवेत आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी त्यांना जेलची हवा खावी लागली होती.कालांतराने त्यांना प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाला.जेलच्या बाहेर येताच ते अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळाले.त्यावरून सर्वत्र गदारोळ उठला होता.ते अजित पवार गटात सामील झाल्याचा विरोधकांनी आरोप केला होता.पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले होते.पण देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य व विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून त्यांनी अजित पवार यांना खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती.त्यांच्या या भूमिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाठिंबा दिला होता.काल तेच नबाब मलिक अजित पवार गटाच्या कोअर कमिटीच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहतात व बैठक संपल्यानंतर सर्वात शेवटी बाहेर पडतात.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे.या घटनेमुळे भाजपला मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने नबाब मलिक यांना त्यांच्या कुर्ला विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तर मुंबईतील हिंदू मते शिवसेनेकडे ( उबाठा ) वळण्याची शक्यता आहे.त्यामुळे भाजप त्यांच्या उमेदवारीला विरोध करेल,अशी शक्यता आहे.अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे आपल्याला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले,अशी स्पष्ट भूमिका घेणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,या प्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.मुंबई शहरात अजित पवार गटाची ताकद नगण्य आहे,त्यांना मुंबईत जागा लढवण्यात स्वारस्य देखील नाही.पण शिंदे गट व भाजपला मात्र मुंबई शहरात त्यांच्यामुळे जबर फटका बसू शकतो.

