दीपक मोहिते,
न्यूजलाईन,
” ही भयाण शांतता कुठवर ?
आपल्या शेजारी असलेला बांगला देश व पाकिस्तान या दोन देशात ज्या राजकीय उलथापालथी घडत आहेत.त्यासंदर्भात आपल्या सरकारने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना
वाजेद याना पदच्युत होऊन भारतात आश्रय घ्यावा लागला.त्यानंतर त्या देशात हिंदूंचे मोठ्याप्रमाणात शिरकाण झाले.त्याप्रकरणी मोदी सरकारने इतर देशाशी सल्लामसलत करून बांगला देशाचे काळजीवाहू सरकार व लष्करावर दबाव निर्माण करायला हवा होता.पण सरकारने अद्याप ठोस अशी भूमिका स्पष्ट केली नाही.
शेख हसीना वाजेद यांना भारतात आश्रय दिल्यामुळे बांगला देशातील अनेक जातीयवादी संघटनांनी भारताचा निषेध केला आहे.जमाते इस्लामी या जहाल विचारसरणीच्या संघटनेने तर शेख हसीना जावेद यांना बांगला देशाच्या ताब्यात देण्यात यावे,अशी मागणी केली आहे.बांगला देशाच्या मुक्तीसंग्रामाच्या वेळी २ लाख हिंदूंचे शिरकाण व १ लाख हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात हीच संघटना आघाडीवर होती.तशीच स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.
मोदी सरकारने भारतात शेख हसीना वाजेद यांना एका अज्ञात ठिकाणी ठेवले आहे.पंतप्रधानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना जावेद यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यांनी आपला अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिलाही असेल.पण त्या संदर्भात पीएमओ कार्यालयाने अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.बांगला देशाच्या पदच्युत पंतप्रधानाना आश्रय देताना मोदी सरकारने बांगला देशातील दोन कोटी हिंदूंच्या जीवन मरणाच्या प्रश्नात हस्तक्षेप करायला हवा होता.जगभरातील ५६ मुस्लिम देशांपैकी एकाही देशाने शेख हसीना वाजेद यांना आश्रय देण्याची तयारी दाखवली नाही.ती आपण दाखवली,पण त्या देशात हिंदूंच्या बाबतीत जे काही घडत आहे,त्यावर केंद्र सरकारने रिऍक्ट व्हायला हवं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी युनूस सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव आणायला हवा होता.या गृह कलहामुळे भारतातून कांदे व अन्य जीवनावश्यक वस्तूची निर्यात ठप्प झाली आहे.या संदर्भातही त्यांनी पावले उचलायला हवी होती.पण तेही घडले नाही.सरकारने वेळीच पावले उचलली नाहीतर ” आग तेथे लागली पण भारतातील उद्योजक व शेतकरी होरपळले,”अस होता कामा नये.त्यामुळे ” ही भयाण शांतता कुठवर ? ” असा प्रश्न भारतीयांना सतावू लागला आहे.

