दीपक मोहिते,
” रणसंग्राम,”
वसई विधानसभा मतदारसंघ,
आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात…
वसई विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात नसणार,या एकमेव कारणामुळे विविध पक्षाच्या अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.२०१९ मध्ये सलग सहाव्यांदा निवडून आलेल्या आ.ठाकूर यांनी २०२४ ची निवडणूक मी लढवणार नाही,असे जाहीर केले होते.त्यामुळे यंदा वसई विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली.पण आ.हितेंद्र ठाकूर पुन्हा रिंगणात उतरतील,असे संकेत मिळू लागल्यामुळे सध्या इच्छुक उमेदवारांमध्ये काहीशी मायूसी निर्माण झाली आहे.आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर आपली डाळ शिजू शकणार नाही, हे माहीत असल्यामुळे हे इच्छुक उमेदवार,यावेळी बविआचा उमेदवार कोण असेल,याविषयी कानोसा घेऊ लागले आहेत.
आ.ठाकूर यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बविआची झालेली पीछेहाट,अशा दोन कारणांमुळे विरोधकात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.आजच्या घडीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भाजप व शिवसेना ( उबाठा ) या तीन पक्षात इच्छुकांची संख्या चढत्या भाजणीवर आरूढ झाली आहे.
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा,हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ताकास तूर लागू देत नाहीत.त्यामुळे विरोधी पक्ष सध्या विमनस्क अवस्थेत आहे.आ.ठाकूर रिंगणात उतरणार आहेत,हे निश्चित झाले कि इच्छुक उमेदवारांची सध्या पाहायला मिळणारी गर्दी पांगण्याची शक्यता आहे.वसई व नालासोपारा या दोन मतदारसंघातील मतदार,हे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला संधी देतात,तर विधानसभा निवडणुकीत ते बहुजन विकास आघाडीला डोक्यावर घेत असतात.गेली तीन दशके असंच घडत आले.अशी स्थिती असूनही अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेद सोडलेली नाही.या निवडणुकीत ठाकूर पितापुत्र रिंगणात उतरले तर मतदार त्यांनाच हमखास संधी देतील,यामध्ये दुमत नाही.

