दीपक मोहिते,
निवडणूक वार्तापत्र,
उमेदवारीसाठी,” पळा,कोण पुढे पळे तो,” शर्यत सुरू,
राज्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला माफक प्रमाणात यश मिळाले असले तरी पालघर जिल्ह्यात या पक्षाचे अस्तित्व अत्यंत नगण्य असे आहे.पक्षाची स्थिती अत्यंत दयनीय असली तरी त्यांच्या इच्छुक उमेदवारामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मॅरेथॉन शर्यत सुरू झाली आहे.साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवू न शकणारे काही स्वयंभू नेतेही या शर्यतीत सामील झाले आहेत.
१९९५ साली आ.हितेंद्र ठाकूर काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर या पक्षाची अक्षरशः वाताहत होत गेली.त्याकाळी पक्षाला उभारी देणारे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही आ.हितेंद्र ठाकूर सोबत पक्षाला सोडचिट्ठी दिली.त्यानंतर काँग्रेसला काही किरकोळ अपवाद वगळता एकही निवडणूक लढवणे शक्य झाले नाही.गेल्या तीस वर्षात झालेल्या पंचायत समिती, लोकसभा,विधानसभा,नगरपरिषदा व महानगरपालिका निवडणुकीत त्यांची पाटी कायम कोरी राहिली.पण गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला माफक यश मिळाले व काँग्रेसजन बेडकासारखे फुगु लागले.त्यांचे अनेक पदाधिकारी आपल्याला वसई विधानसभेची उमेदवारी मिळावी,म्हणून ” पळा पळा कोण पुढे पळे तो,” अशा शर्यतीमध्ये दाखल होऊ लागले आहेत.पण वसई व नालासोपारा या दोन मतदारसंघात या मंडळींना आपली अनामत रकमाही वाचवता येणार नाहीत.कारण या दोन्ही जागांवर भाजप व बहुजन विकास आघाडी यांच्यामध्येच सरळ लढती होण्याची शक्यता आहे.आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितिज ठाकूर हे पितापुत्र रिंगणात असतील.त्यामुळे भाजपला या दोन्ही जागांवर कडवी झुंज द्यावी लागणार आहे.पुढील महिन्यात ३७ दिवसाची आचारसंहिता लागू होत आहे,त्यामुळे जिल्ह्यात विकासकामांना मोठ्याप्रमाणात मंजुरी व आर्थिक निधी उपलब्ध करण्यात येत आहे.वसई विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे सध्या पाच जण इच्छुक आहेत,तसेच ही यादी निवडणुकीच्या तोंडावर मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत जाईल,अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

