दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,भाग क्र.३, ” श्रीलंका,”
फ्रंटलाईन,
श्रीलंका ; देश अद्याप सावरू शकला नाही,चीनची संगत भोवली,
बांगलादेशात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जे काही घडले तसेच दोन वर्षांपूर्वी श्रीलंकेत घडले होते.बांगला देशात जे काही घडले,त्याला अमेरिकेची फूस होती.तर श्रीलंकेतील घडामोडीमागे साम्यवादी चीन होता.या दोन्ही देशात जे काही घडले,त्यामध्ये एक साम्य होते,ते म्हणजे सत्तेत असलेले ” सरकार उलथवून टाकणे,” व दक्षिण आशियात पाय रोवणे..
गेल्या काही वर्षांपासून श्रीलंका या देशात निर्माण बिकट आर्थिक परिस्थितीमुळे तो देश पार डबघाईला आला आहे.या देशावर कोसळलेले आर्थिक संकट,हे अत्यंत भयावह असून त्यातून सावरण्यासाठी त्याला पाच ते सहा अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही आपला हात आखडता घेतला आहे,त्यामुळे श्रीलंका प्रचंड सध्या प्रचंड अडचणीत सापडला आहे.परकीय चलनाचा खडखडाट,घेतलेल्या कर्जावरील भरमसाठ व्याज,त्यामुळे आयातीचा वेग पार मंदावला आहे.परिणामी लोकांच्या मूलभूत गरजा भागवणेही सरकारला शक्य होत नाही. लोकांचं जगणं कठीण झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले व त्यांनी हिंसक आंदोलन सुरू केले.राष्ट्राध्यक्ष राजपक्षे व विक्रमसिंघे यांच्या निवासस्थानात जमाव घुसला व प्रचंड नासधूस करण्यास सुरुवात केली.या घटनेनंतर देशभरात आगडोंब उसळला.हे सर्व घडण्यामागे चीन व अमेरिका देशात असलेली सुप्त स्पर्धा हे एकमेव कारण होते.
चीनने गेल्या काही वर्षात श्रीलंकेमध्ये प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.या माध्यमातून त्याने श्रीलंकेत राजकीय व आर्थिक अस्थिरता निर्माण केली.चीनच्या आहारी गेलेल्या श्रीलंकेच्या नेत्यांना चिनी ड्रॅगनची ही चाल ओळखता आली नाही.त्यांनी सुमारे ५१ अब्ज डॉलर्सची कर्जे घेतली व पण त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे त्यांना त्याचे व्याजही देणे शक्य झाले नाही.कारण या काळात पर्यटन ठप्प झाले होते.महागाईमध्ये ५३ % नी वाढ झाली.तिजोरीतील गंगाजळीत खडखडाट होता.परकीय चलनात ८३ % ने घसरण झाली होती.सरकारने कर्जे घेतली पण ती फेडण्यासाठी आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.श्रीलंकेतील निर्माण झालेली स्थिती चीन व अमेरिका यांना फायदेशीर ठरणार होती.अशावेळी सरकारने घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात चीनला मोक्याचे हंबानटोटा बंदर ९९ वर्षाच्या लीजवर दिले.त्यामुळे त्याचे देशभरात पडसाद उमटले. भारताच्या दक्षिणेस असलेल्या या मोक्याच्या देशात चीनला लष्करी तळ निर्माण करायचे आहेत.येथे आपण पाय रोवू शकलो तर येथून आपण दक्षिण आशियातील देशाच्या हालचालीवर लक्ष ठेवू शकू,असा त्यांचा उद्देश आहे.त्यासाठी त्यांना मोठ्याप्रमाणात कर्जपुरवठा करून आर्थिक संकटाच्या खाईत ढकलले आहे.
दक्षिण आशियामध्ये भारताचे वर्चस्व निर्माण होऊ नये,यासाठी हे दोन्ही देश कायम धडपडत असतात.हे दोन्ही देश विभिन्न विचारसरणीचे आहेत,पण दक्षिण आशियात भारताचा डंका वाजू नये,यासाठी सतत उचापत्या करत असतात.चीनने काही वर्षांपूर्वी मालदीव देशातही अशीच खेळी केली होती.मालदीवमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या सरकारनेही मध्यंतरी चीनच्या नादी लागून आपल्याविरोधात कोल्हेकुई सुरू केली होती.त्यामुळे भारताने आपल्या देशातील पर्यटकांनी मालदिवात जाऊ नये,असा फतवा काढला व मालदीव सरकारचे विमान जमिनीवर आले.
क्रमशः

