दीपक मोहिते,
विधानसभा निवडणुकीचे पडघम,
फ्रंटलाईन,
लवकरच चार राज्याच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता,
येत्या नोव्हें.महिन्यात महाराष्ट्रासह झारखंड,हरियाणा व जम्मू-काश्मीर या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे.या चारही राज्यातील मतदारयाद्या अद्यायावत करण्याचे काम येत्या २० ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.
जम्मू व काश्मीर राज्यात २०१८ साली भाजप व पीडीपी युतीचे सरकार होते,भाजपने २०१८ साली युती तोडल्यामुळे सरकार गडगडले,तेव्हापासून या राज्यात राष्ट्पती राजवट आहे.हरियाणा राज्यात भाजप-जेजेपी युतीचे सरकार होते.येत्या ३ नोव्हें.२०२४ रोजी विधानसभेची मुदत संपत आहे.येथे गेल्या निवडणुकीत भाजप व जेजेपी युतीला अनुक्रमे ४१ व १० जागा मिळाल्या होत्या.भाजपने अन्य सात अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते.राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहरलाल खट्टर यांची वर्णी लागली होती,पण त्यांना पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.त्यानंतर मुख्यमंत्री नायब सैनी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.येथे ९२ जागासाठी निवडणूक होणार आहे.
झारखंड राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले.त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.त्यांच्या जागी पक्षाने चंपाई सोरेन यांची निवड करण्यात आली. या राज्याच्या विधानसभेची मुदत ४ जाने.२०२५ पर्यंत आहे.पण येथे ऑक्टो.महिन्यात निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.एकूण ८१ जागासाठी निवडणूक होणार आहे.गेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा-२९,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१७,आरजेडी व सिपीआय प्रत्येकी ०१ असे बलाबल निर्माण झाले होते.मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण १४ जागांपैकी भाजपने ८ जागा जिंकल्या.उर्वरीत ६ जागांपैकी जेएमएम-३ काँग्रेस-२ एजीएसयु पक्ष-१ जागा जिंकता आली.
महाराष्ट्रात भाजप,शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांच्या महायुतीचे सरकार आहे.या विधानसभेची ८ नोव्हें.२०२४ ला संपत आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून युतीमध्ये बेबनाव निर्माण झाला व युती तुटली.त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग राबवला.अडीच वर्षानंतर भाजपने एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आपल्या गळाला लावले व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत बसवले.गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र महायुतीला मतदारांनी साफ नाकारले.या निवडणुकीत काँग्रेस-१३,शिवसेना ( उबाठा ) ९ तर राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट )-८ व अपक्ष -१ असे महाविकास आघाडीचे बलाबल निर्माण झाले.तर उर्वरित १७ जागा महायुतीला मिळाल्या.
आता होत असलेल्या चार राज्यात मतदार कोणाला कौल देतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या चार राज्याच्या निवडणुका संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

