दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,( भाग क्र.२ ) नेपाळ,
फ्रंटलाईन,
नेपाळमध्ये चिनी ड्रॅगन हातपाय पसरतोय,
भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेजारी असलेल्या प्रत्येक देशासोबत कायम मैत्रीचे संबंध राखले.नेपाळ,बांगलादेश,
भूतान,म्यानमार,श्रीलंका,
मालदीव,अफगाणिस्तान व आपल्याला कायम शत्रूराष्ट्र समजणाऱ्या पाकिस्तानशी आपण मिळते जुळते घेत आलो.पाकिस्तान वगळता इतर देशासोबत आपले आजही मैत्रीचे संबंध आहेत.पण भूतान वगळता इतर सर्व देशांनी अमेरिका व चीनच्या आहारी जाऊन भारताला अनेकदा त्रास दिला.ज्या बांगला देशाच्या निर्मितीसाठी भारताने आपले सर्वस्व पणाला लावले,तो देशही आता आपल्या विरोधात उभा ठाकला आहे.दक्षिण आशियात भारताचा दबदबा निर्माण होता कामा नये,यासाठी अमेरिका व चीन,हे दोन देश कायम उचापती करत होते व आजही करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्या शेजारी असलेल्या नेपाळला मुक्तहस्ते आर्थिक मदत देऊ लागला आहे.रस्तेबांधणी व भव्य प्रोजेक्ट उभारणे,इ.विकासकामे करू लागला आहे.एरवी भारताशिवाय ज्या नेपाळचे पान हलत नव्हते,तो नेपाळ आता आपल्याकडे डोळे वटारून पाहू लागला आहे.गेली सात दशके आपण या देशाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आलो आहोत व आजही करत आहोत.आपण जर त्यांना रॉकेल दिले नाही तर नेपाळवासीयांची चूल पेटू शकत नाही.त्यामुळे नेपाळच्या राजेशाही राजवट व त्यानंतर आलेल्या प्रत्येक सरकारने आपल्या देशाशी कायम मिळते जुळते घेतले.पण गेल्या वर्षांपासून चीनने या देशात आपल्या उचापती सुरू केल्या आहेत.त्यास नेपाळ काही अंशी बळी पडला.दरम्यानच्या काळात नेपाळच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या.राजेशाही राजवटीचा अंत होऊन माओवादी नेते प्रचंड यांच्याकडे सत्तेची सारी सूत्रे आली.प्रचंड हे नेपाळचे पंतप्रधान झाले,त्यांची विचारसरणी ही अत्यंत जहाल अशी असून साम्यवादाकडे झुकणारी आहे.त्यांचे सत्तेत विराजमान होणे,हे चीनच्या हातात कोलीत मिळण्यासारखे होते.बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन चीनने या देशावर आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या नेपाळचे अनेक नेते चीनच्या कच्छपी लागले.बहु जातीय,बहुभाषिक,
बहुधर्मिक व बहूसांस्कृतिक अशी ओळख असलेला व लोकशाही व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देणारा नेपाळ हा चीनच्या आमिषाला बळी पडला व आपल्याशी फटकून वागू लागला.यापूर्वी कधीही भारताविरोधात नेपाळमध्ये निदर्शने झाली नव्हती,तरुणवर्ग कधीही भारताच्या विरोधात रस्त्यावर उतरले नव्हते.हल्ली ते प्रकार सुरू झाले आहेत.भारताशी नेपाळचे सीमेप्रश्नी काही किरकोळ वाद होते,पण ते सुप्त स्वरूपात होते.पण चीनने या वादाला हवा दिली व सीमेवरील टापू अशांत बनला.चार वर्षापूर्वी नेपाळच्या लष्कराने सीमेवर हालचाली सुरू केल्या होत्या.पण भारताने त्यांची रसद रोखल्यामुळे नेपाळ वठणीवर आला.भारताने जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा बंद केला तर देशात हाहाकार उडेल व परिस्थिती हाताबाहेर जाईल,याची जाणीव झाल्यानंतर नेपाळचे सरकार नरमले.सध्या नेपाळ शांत असला तरी तो भविष्यात तसा राहीलच,याची गॅरंटी नाही.चीनचा ड्रॅगन मदत देण्याचे आमीष दाखवून हातपाय पसरण्याच्या तयारीला लागला आहे.मात्र नेपाळचे विद्यमान पंतप्रधान के.पी.शर्मा ओली,हे चीनची महत्वकांक्षा ओळखून आहेत.तसेच भारतासोबत वितुष्ट निर्माण होणे,आपल्याला परवडणारे नाही,त्यामुळे ते चीनशी हातचे राखून वागत आहेत.सुमारे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ८१ % लोक हिंदू आहेत.९० % लोक शेतीवर अवलंबून आहेत,लोकांचे दरडोई उत्पन्न हे २११ डॉलर्स म्हणजे १२ हजार इतके आहे.देशाचे सकल उत्पन्न हे,केवळ ४५ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे.हा देश डोंगराळ प्रदेशाचा असल्यामुळे उद्योगवाढीला गेल्या ७० वर्षात चालना मिळू शकली नाही,त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे.येथील लोक रोजगार मिळवण्यासाठी भारतात येत असतात.या देशातील गरिबीचा फायदा घेऊन चीन या देशात शिरकाव करू पाहत आहे.पण चीनचा हा डाव साध्य होईल,असे वाटत नाही,पण भारताने मात्र बेसावध राहता कामा नये.
क्रमश

