दीपक मोहिते,
भारत सरकारने बांगला देशातील २ कोटी हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्याची गरज,
बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीचा अंत झाल्यानंतर या देशात वर्षांनुवर्षे राहणारे दोन कोटी हिंदू नागरीक सध्या संकटात सापडले आहेत.हिंदूंची घरे,मंदिराना लक्ष्य करण्यात आले आहे.दहा दिवसांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर देशातील हिंदूंना असुरक्षित वाटू लागले आहे.त्यामुळे मोदी सरकारने नवनिर्वाचित पंतप्रधान महंमद युनूस यांच्याशी बोलायला हवे.महंमद युनूस हे भारताचे मित्र आहे,” बचत गट ,” ही संकल्पना त्यांनी सर्वप्रथम आपल्या बांगला देशात राबवली,त्यानंतर भारताने त्याचे अनुकरण केले.या संदर्भात भारतात त्यांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती.आपल्याशी असलेले सौहार्दाच्या संबंधाचा वापर करत मोदी सरकारने आता जलदगतीने पावले उचलायला हवीत.कारण गेल्या ५० वर्षात बांगला देशातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले,हजारो मंदिरे उध्वस्त करण्यात आली.वारंवार होणारे हल्ले,छळ व अत्याचार इ.घटनांमुळे गेल्या काही वर्षात ११ लाख हिंदूंनी हा देश सोडला.तर दरवर्षी दोन लाख हिंदू देश सोडून जात आहेत.अफगाणिस्तान,
पाकिस्तान व बांगला देश या मुस्लिमबहुल देशात हिंदू समाजावर धर्माच्या आधारे कायम अत्याचार करण्यात येत असतात.सध्या होत असलेल्या घडामोडीनंतर आता हिंदूंचे पलायन सुरू झाले आहे.लाखो हिंदू नागरिक भारताच्या सीमेवर दाखल झाले आहेत.भारताने आपल्या सीमा बंद ठेवल्यामुळे त्यांना घुसखोरी करता येत नाही.देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गरीब लोकांना अन्नधान्य वितरण करणाऱ्या इस्कॉन मंदिरालाही धर्मांध लोकांनी सोडले नाही.बांग्लादेशीय हिंदू असुरक्षित असून सुमारे १ कोटी हिंदू निर्वासित बंगालमध्ये दाखल होतील,अशी भिती व्यक्त कऱण्यात येत आहे.मात्र सतत हिंदुत्वाचा घोषा करणारे व उठसुठ मूल्याची पोपटपंची करणारे तथाकथित नेते हिंदूंवर होणारे हल्ले,अत्याचार व पलायनावर मूग गिळून बसले आहेत.आपल्या सरकारने हिंदू म्हणून बांगला देशातील हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.कारण भारत,नेपाळ नंतर जगात तिसरी सर्वाधिक हिंदू लोकसंख्या ही या बांगला देशात आहे.
