दीपक मोहिते,
आदिवासी समाज,शिक्षण,साक्षरता व रोजगार क्षेत्रात आजही मागासलेलाच,
कुपोषणाचा शाप आजही ” जैसे थे,” स्थितीत,
आज जगभरात जागतिक आदिवासी दिन साजरा होणार आहे.आजच्या घडीला जगात आदिवासींची सुमारे ४२ कोटी इतकी लोकसंख्या असून सुमारे पाच हजार आदिवासी समूह आहेत.या समूहाच्या सात हजार भाषा आहेत.या समाजाची ओळख मूलनिवासी असून त्यांचे वास्तव्य जंगल व डोंगर- दर्याखोऱ्यात पाहायला मिळते.हा समाज शांतताप्रिय असून निसर्गाचा पूजक आहे.निसर्गाचे संरक्षण व संवर्धन हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे तो मानतो.असे असूनही त्याचे शेकडो वर्षांपासून या समाजाचे शोषण होत आले आहे व आजही होत आहे.
त्यांना मागासलेले,रानटी ठरवत इतर समाजानी त्यांनी शिक्षण,रोजगारापासून कायम वंचित ठेवले.त्यामुळे या समाजाच्या नशिबी अठरापगड दारिद्र्य आले.त्यांना संविधानाने दिलेले अधिकार व हक्कापासून वंचित ठेवण्यात आले.समाजाची अशी अवस्था पाहून काही समाज सुधारकांनी एकत्र येऊन १९१६ मध्ये चळवळी सुरू केल्या.६५ ते ७० वर्षे या चळवळी सुरू होत्या.मात्र या समाजाची परिस्थिती ” जैसे थे,” अशीच होती.९ ऑगस्ट १९८२ मध्ये या ज्वलंत विषयावर संयुक्त राष्ट्र संघटनेने जिनिव्हा येथे बैठकीचे आयोजन केले.या बैठकीनंतर जगभरात बैठकीचा सिलसिला सुरू झाला.सतत चर्चा-विनिमय व विचारमंथन होत राहिले.त्यानंतर १९९४ हे साल संयुक्त राष्ट्राने आदिवासी वर्ष म्हणून घोषित केले.त्यानंतर १९९५ ते २००५ व २००५ ते २०१४ हे दोन्ही दशक आदिवासी दशक म्हणून जाहीर केले.अशाप्रकारे हा समाज हळूहळू जगाच्या पटलावर दिसू लागला.९ ऑगस्ट १९८२ च्या जिनिव्हाच्या बैठकीची आठवण म्हणून ९ ऑगस्ट १९९५ रोजी जगभरात पहिल्यांदा जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
त्यानंतरच्या काळात हा समाज मुख्य प्रवाहात सामील झाला.त्याला शिक्षणाची कवाडे उघडली गेली,रोजगार क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध होऊ लागल्या.पूर्वी काळी या समाजाला कामाच्या शोधात भटकंती करावी लागत होती.त्याचा परिणाम त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर होत असे.पण आता त्यामध्ये खूप बदल झाला आहे.या समाजात निसर्गाची पूजा करणे,प्राण्यांचे बळी देणे व डोक्यावर टस्क घालणे,आदी प्रथा आजही कायम आहेत.शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून ग्रामीण भागातील शेतीमध्ये त्यांना चांगला रोजगार उपलब्ध होतो.हा समाज हिंदूंच्या परंपरा,संस्कृती व सण-उत्सव पाळतात.शिक्षण,रोजगार व राजकारणात आरक्षण मिळाल्यामुळे या तिन्ही क्षेत्रात या समाजाचे लोक विविध पदावर विराजमान झाल्याचे पाहायला मिळते.आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याच समाजाचे प्रतिनिधीत्व करतात.नव्या पिढीने आता जीवनशैली बदलली असली तरी संस्कृती व परंपरा त्यांनी आजही जोपासल्या आहेत.
मात्र या समाजाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.आपल्या सरकारने या समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे.हे मंत्रालय आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून या समाजासाठी विविध योजना राबवते,त्यासाठी केंद्र व राज्य सरकारे आपापल्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुदी करत असतात.त्याचा फायदा या समाजाला होत असतो.पण आजही या समाजाचे अनेक प्रश्न व समस्या प्रलंबित आहेत.हा समाज,शिक्षण, रोजगार,साक्षरता क्षेत्रात मागासलेला आहे.या समाजाच्या बालकांमध्ये असलेले कुपोषण आजही कायम आहे.त्यांची ही अवस्था आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

