दीपक मोहिते,
आंतरराष्ट्रीय घडामोडी,
बांगला देशातील घडामोडीमागे पाकिस्तान व चीन,
बांगला देशात उसळलेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही,जाळपोळ,दगडफेक व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान,अशा घटनांनी हा देश सध्या होरपळून निघाला आहे.बांगला देश निर्मितीसाठी आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या वंगबंधू शेख मुजीबर रेहमान यांची नामोनिशाणी मिटवण्याचा आंदोलकांनी जणू चंगच बांधल्याचे दिसून आले आहे.देशात उभारण्यात आलेले त्यांचे पुतळे उध्वस्त करण्यात येत आहेत.
बांगला देशात सुरू झालेला हिंसाचार आठव्या दिवशी सुरूच आहे.देशात सर्वत्र संचारबंदी लागू असूनही लष्कराला हिंसाचारावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे.आतापर्यंत ५०० हुन अधिक लोक या हिंसाचारात मृत्युमुखी पडले आहेत.आतापर्यंत अब्जावधी रु.चे नुकसान झाले.अनेक सरकारी कार्यालये या हिंसाचारात उध्वस्त झाली आहेत.हा जो उठाव झाला आहे,त्यामागे परकीय शक्ती असल्याचे जगभरातील गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.पाकिस्तानची आयएसआय व चीनचा यात हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या देशातील जमात-ए-इस्लामी संघटनेची विद्यार्थी शाखा असलेल्या इस्लामिक स्टुडंट्स कॅम्पने हे आंदोलन पेटवण्यात अहम भूमिका पार पाडली.या संघटनेला पाकिस्तान व चीन या देशातून फंडिंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.शेख हसीना यांना भारताकडून सतत मदत होत असल्यामुळे जमात-ए-इस्लामी ही संघटना त्यांच्या विरोधात गेली अनेक वर्षे सक्रिय आहे.या संघटनेने यापूर्वी भारताविरुद्ध अनेक कट कारस्थाने केली होती.ती भारत विरोधी असल्यामुळे पाकिस्तान व चीन त्यांना सतत फंडिंग करत असतात.यावेळी या दोघांनी शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यासाठी हिंसाचार करण्यास प्रोत्साहन दिले व त्यासाठी मोठ्याप्रमाणात फंडिंग केल्याचे गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.वंगबंधू शेख मुजीबर रहमान यांनी १९७१ साली भारताची मदत घेऊन स्वतंत्र बांगला देश निर्माण केला.तेव्हापासून पाकिस्तान दुखावला गेला होता.खनिज,ज्यूट व विविध नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असलेला पूर्व पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली व पाकिस्तान आजतागायत स्वतःला सावरू शकला नाही.त्यामुळे पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा बांगला देशातील शेख हसीना सरकारच्या विरोधातील संघटनांना सतत खतपाणी घालत असते.याकामी चीन देखील पाकिस्तानला मदत करत असतो.चीन हा देश दक्षिण आशियात भारताचे वर्चस्व निर्माण होऊ नये,यासाठी अनेक देशांना आर्थिक मदत देणे,रस्ते बांधणे, जलविद्युत प्रकल्प उभारणे तसेच भारताच्या समर्थक देशातील सरकारविरोधातील संघटनांना सर्वप्रकारची मदत देणे,असे प्रकार करत असतो.बांगला देशात जो हिंसाचार सुरू आहे,त्यामागे हे दोन्ही देश असून त्यांना बांगला देशात लष्करी राजवट आणायची आहे.या देशात लष्करी राजवट आली तर ती भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.नेपाळमध्येही चीन अशाप्रकारची खेळी गेली अनेक वर्षे खेळत आहे.नेपाळचे माजी पंतप्रधान प्रचंड हे चीन? समर्थक असून चीन त्यांना हाताशी धरून नेपाळमध्ये आपले बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहे,पण नेपाळ हा जीवनावश्यक वस्तूसाठी भारतावर अवलंबून असल्यामुळे चीनच्या कट-कारस्थाने यशस्वी होत नाही.

