दीपक मोहिते,
संपादकीय,
बांगला देशातील अराजकता ; केंद्र सरकार अलर्ट मोडवर,
बांगला देशात सध्या प्रचंड अराजकता निर्माण झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे.देशात जी धुमश्चक्री सुरू आहे,ती लक्षात घेऊन आपल्या सरकारने सीमावर्ती भागात असलेल्या राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर सीमा सुरक्षा दलाने बांगला देशाच्या सीमेवर खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.
पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर देशात आता लष्करी राजवटीचा अंमल सुरू झाला आहे.बांगला देशात लष्कराची राजवट येण्याची ही दुसरी घटना आहे.यापूर्वी तत्कालीन लष्करप्रमुख झिया उर रहमान यांनी १९७७ साली उठाव करून सत्ता ताब्यात घेतली होती.सन १९८१ पर्यंत ते राष्ट्रपतीपदावर कार्यरत होते.त्यानंतर झिया उर रहमान यांचीही बंडखोरांनी हत्या केली.या दोन घटना घडल्यानंतर शेख मुजीबर रहमान यांची कन्या शेख हसीना व झिया उर रहमान यांची पत्नी खालीदा झिया या दोन महिलांमध्ये सत्तास्पर्धा सुरू झाली.या सत्तास्पर्धेत खालीदा झिया याना तीन वेळा बांगला देशवासियांनी सत्ता दिली.पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो या मुस्लीम जगतातील या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्यानंतर खालिदा झिया या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला पंतप्रधान ठरल्या.त्यानंतर मात्र २००९ पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत शेख हसीना यांनी बाजी मारली.तब्बल १५ वर्षे सत्तेत असलेल्या शेख हसीना यांचा कल कायम भारताकडे राहिला.सगळं सुरळीत सुरू असताना आरक्षण प्रश्नी दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या एका निकालाने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला व त्यांच्या सत्तेला घरघर लागण्यास सुरुवात झाली होती.अखेर या असंतोषाचा गेल्या आठवड्यात स्फोट झाला व त्यांना देशातून परागंदा व्हावे लागले. देशात सुरू असलेल्या अराजक परिस्थितीचा परिणाम आपल्या देशावर होणार असल्यामुळे आपले सरकार आता अलर्ट मोडवर आले आहे.विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाल्यास निर्वासितांचा लोंढा आपल्या देशाच्या दिशेने सुरू होईल,अशी शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने सीमावर्ती भागावर लक्ष केंद्रित केले आहे.काही वर्षांपूर्वी म्यानमार देशात वांशिक दंगली होऊन लाखो
रोहिंग्या जातीचे नागरिक मारले गेले.या देशात २०१२ साली त्यांची लोकसंख्या ८ लाख इतकी होती,ती २०१७ साली १३.५० लाखावर गेली.त्यामुळे मूलनिवासी असलेल्या इतर समाजात असुरक्षिततेची भावना उफाळून वर आली व लाखो रोहिग्यांना पळ काढावा लागला.सुमारे ४० हजार रोहिंगे आपल्या त्रिपुरा,आसाम व ईशान्येकडील इतर राज्यात राहत आहेत.त्याची पुनरावृत्ती होता कामा नये,यासाठी केंद्र सरकार अलर्ट झाले आहे.

