दीपक मोहिते,
सूर्यातीर,
पर्यटनवाढीसाठी जोमाने प्रयत्न हवेत,
दरवर्षी राज्य व केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात पर्यटन क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करत असते.मात्र इतर देशांच्या तुलनेत आपले पर्यटनक्षेत्र गेल्या सात दशकात वाढू शकले नाही.गेल्या ७७ वर्षात पर्यटनवाढीसाठी हजारो कोटी रु.च्या तरतुदी करण्यात आल्या.पण अजूनही आपल्या पर्यटनक्षेत्राला सुगीचे दिवस येऊ शकले नाही.
ज्या कोकण परिसराला आपण कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न पाहतो,तो कोकण आजही उपेक्षितच आहे.अस का घडलं ? तर या प्रश्नाचं उत्तर आहे,नोकरशाहीचा करंटेपणा व
लोकप्रतिनिधींची उदासीनता होय.आपल्या राज्यात कोकण,प.महाराष्ट्र,विदर्भ व
उ.महाराष्ट्र या उपविभागात अनेक पर्यटनस्थळे असून ते विकसित करण्याच्या दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात प्रभावीपणे विकासकामे झाली नाहीत.कोकणचा निसर्गरम्य समुद्रकिनारा,गडकिल्ले,
प्रसिद्ध देवस्थाने,कर्नाळा अभयारण्य,डोंगरमाथ्यावर वसलेले माथेरान,नंदुरबार जिल्ह्यातील तापी खोरे,चंद्रपूर येथे ताडोबा व्याघ्र प्रकल्प,पुण्याचे सिंहगड,शनिवारवाडा,
संभाजीनगरच्या अजिंठा-एलोरा लेणी,बीबी का मकबरा,कोकणातील गणपतीपुळे,रत्नदुर्ग किल्ला,आरे-वारे बीच,दापोली,गुहागर व श्रीवर्धन इ.निसर्गरम्य समुद्रकिनारे,कोल्हापुरची महालक्ष्मी मंदिर,महाबळेश्वर,कास पठार,कोयना धरण,अजिंक्यतारा किल्ला,कोयना अभयारण्य, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,पंचवटी व कोल्हापूर जिल्ह्यात रंकाळा तलाव व पन्हाळा,ही पर्यटनस्थळे पर्यटकांची आकर्षणे आहेत.मात्र या ठिकाणी पर्यटनक्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव आहे.आज महाराष्ट्रातील अनेक किल्ले अखेरच्या घटका मोजत आहेत.वसईचा किल्ला हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.हा किल्ला दिवसागणिक ढासळतोय, पण पुरातन विभाग त्याची दुरुस्ती व डागडुजी करत नाहीत.त्यामुळे या किल्ल्याकडे पर्यटक फिरकत नाहीत.हा ऐतिहासिक किल्ला आता प्रेमीयुगुले व दारुड्याचा अड्डा बनला आहे.पालघर जिल्ह्यात जवळपास १०० हुन अधिक लहानमोठे गडकिल्ले आहेत.पण या गडकिल्ल्याकडे आपल्या एमटीडीसीने आजवर कधीही लक्ष दिले नाही.हे गडकिल्ले सर करणाऱ्या गिर्यारोहकांची या गडकिल्ल्याना पहिली पसंती असते,मात्र या गडकिल्ल्यावर कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.जव्हार येथे असलेला राजे मुकणे यांचा राजवाडाही पर्यटकांना खुणावत असतो.मात्र या परिसरातही कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.जव्हार हे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.जव्हार गाव हे उंच डोंगरावर असून एकेकाळी येथे हवामान वर्षाचे बारा महिने थंड असायचे,पण गेल्या काही वर्षात वाढती बांधकामे व प्रचंड नागरीकरण इ.कारणामुळे हवामानात वेगाने बदल होत गेला व निसर्गाचे ऋतुचक्र पार बदलले गेले.गेल्या काही वर्षांपासून जव्हारकर या परिसराला पर्यटनाचा दर्जा द्या,अशी मागणी करत आहेत,पण सरकार दरबारी त्याची दखल घेण्यात येत नाही.त्यामुळे हा परिसर दिवसेंदिवस भकास होत चालला आहे. अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रु.तरतुदी कुठे खर्च करण्यात येतो,हा एक संशोधनाचा विषय आहे.काही किरकोळ अपवाद वगळता
अनेक पर्यटनस्थळे आजही उपेक्षितच आहेत.पर्यटनवाढीच्या माध्यमातून रोजगार,ही संकल्पना किती महत्वाची आहे,आणि ती आपण स्विकारली आहे,मात्र त्याच्या अमलबजावणीकडे एकाही सरकारने जाणीवपूर्वक लक्ष दिले नाही,त्यामुळे आज आपले राज्य पर्यटन क्षेत्रात पिछाडीवर गेले आहे.केरळ,गुजरात,गोवा,
राजस्थान व कर्नाटक राज्य सरकारांनी पर्यटनवाढीवर प्रचंड भर दिला आहे.आपल्या राज्यात ऐतिहासिक गडकिल्ले व निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला असताना पण आपण उदासीन आहोत,हे आपले दुर्देवच म्हणावे लागेल.पर्यटनवाढीला चालना मिळाली असती तर ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळू शकले असते व ग्रामीण भाग समृद्धीच्या मार्गावर गेला असता,पण त्या दृष्टीने अपेक्षित या क्षेत्रात अपेक्षित विकासकामे होऊ शकली नाहीत.

