दीपक मोहिते,
वास्तव,
भूमीपुत्राना उध्वस्त करू नका,मुख्यमंत्र्यांना हजारो भूमीपुत्रांचे साकडे,
गेल्या आठवड्यात विरार पश्चिमेस असलेल्या नवापूर या समुद्रकिनारी असलेल्या गावात सेव्हन सी बीच रिसॉर्टससमोर घडलेल्या हाणामारीच्या घटनेत मिलिंद मोरे या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली,या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मित्राचा मुलगा होता.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ते रिसॉर्टस तोडण्याचे आदेश दिले व महसूल विभागाने वेळ न दवडता तो एका रात्रीत जमीनदोस्त केला.मुख्यमंत्री शिंदे यांची ही कृती म्हणजे केवळ बेजबाबदारपणा होता.ज्या मुलांनी हाणामारी केली त्यांच्यावर कारवाई सुरू असताना रिसॉर्टस तोडणे हे अत्यंत चुकीचे होते.
कारण ज्या तरुणांनी मिलिंद मोरे याना मारहाण केली,त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली,असं असताना रिसॉर्टस जमीनदोस्त करणे,हे अमानवी कृत्य होते.जे काही घडलं त्याचे कदापी समर्थन होऊ शकत नाही.पण पाच स्थानिक भूमीपुत्रांनी कर्ज काढून आपापल्या बायकांचे दागिने विकून पै,पै,जमा करून ते उभारले होते.त्यावर सुमारे ५ कोटी रु.खर्च करण्यात आले होते.ते तोडताना शेकडो महिलांनी जो हंबरडा फोडला ते पाहून बांधकाम तोडणारे कर्मचारी देखील गहिवरले होते.या रिसॉर्टसमध्ये सुमारे १५० कुटुंबांना रोजगार मिळत होता.आज त्या सर्व कुटुंबाची उपासमार होत आहे.या परिसरातील इतर रिसॉर्टसही तोडण्यात येणार असल्याचे काल महसूल अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असावेत.पण जर ही कारवाई झाली तर ती स्थानिक भूमिपुत्रांना उध्वस्त करणारी ठरेल.या रिसॉर्टस व्यवसायावर अनेक लहानमोठे व्यवसाय अवलंबून आहेत.हजारो कुटुंबे या व्यवसायावर आपला चरितार्थ चालवत आहेत.अशा भूमिपुत्रांना देशोधडीला लावण्याचे पाप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करू नये.तसेच रिसॉर्टस व्यवसायिकांनीही रिसॉर्टसमध्ये काम करणाऱ्या आपल्या कामगारांना योग्य ती समज द्यायला हवी.तसेच रस्ते अडवून बसेस पार्क करणे,रात्रीच्या वेळी कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणे,असे प्रकार त्यांनी बंद केले पाहिजेत.व्यवसाय करा,पण परिसरातील नागरिकांना त्रास होईल,अशी कृत्ये करू नका.असो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेली कारवाई पुरेशी असून मानवतेच्या दृष्टीकोनातून पुढील कारवाई करू नये,असे भूमीपुत्रांचे म्हणणे आहे.

