दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
तीन इंजिनचे सरकार पुन्हा सत्तेच्या रुळावर येणे,अशक्यच…
लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसल्यामुळे तीन इंजिनचे सरकार सध्या खिरापत वाटत सुटलं आहे.सरकारने सार्वजनिक पैश्याची कितीही उधळपट्टी केली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना १०० % धोबीपछाड देतील,यात बिलकुल शंका नाही.कायदा व सुव्यवस्थेची खालावलेली स्थिती,वाढती महागाई,बेरोजगारी,
उद्योगधंदे वाढीची खुंटलेली गती,कृषी क्षेत्राची दैनावस्था,शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती,मराठा व आरक्षण प्रश्नी सरकारची चालाखी,इ.कारणे महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत.या तीन इंजिन सरकारने गेल्या अडीच वर्षात रयतेच्या मूलभूत गरजा,त्यांच्या दैनंदिन समस्या,सोडवण्यावर भर देण्याऐवजी इन्व्हेंट करणे व त्यासाठी लाखो कोटींची खिरापत वाटणे,यामध्ये धन्यता मानली.वास्तविक त्यांनी विश्वस्तांच्या भूमिकेत राहून राज्यशकट हाकणे अपेक्षित होते,पण ते मालकाच्या भूमिकेत वावरत आहे.” माझी लाडकी बहीण,” योजनेसाठी पैसा आणणार कुठून ? असा प्रश्न आता वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारीच विचारू लागले आहेत.तर अनेकांनी ही योजना विधानसभा निवडणुकीनंतर जेमतेम दोन ते तीन महिने चालेल,अशी भिती व्यक्त केली आहे.त्यांच्या या म्हणण्यात तथ्य असून अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यावरून ते सिद्ध झाले आहे.आज हे तीन इंजिनचे सरकार ” रस्तेबांधणी,” हा एकमेव कार्यक्रम राबवत आहे.रस्ते बांधणीला सध्या इतके महत्व का आले आहे,ते तुम्हाला-आम्हाला सांगायला नको.गेल्या अडीच वर्षात या विकासकामांवर जेवढा खर्च सरकारने केला.तो एका छोट्या राज्याचा वार्षिक अंदाजपत्रकाइतका आहे.हे करत असताना या सरकारने केवळ शहरामध्ये रस्त्याचे जाळे विणले,पण ग्रामीण भागातील रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.आजही राज्याच्या ग्रामीण भागातील पाड्यावर धड चालायला रस्ते नाहीत.त्यामुळे एसटी किंवा अन्य वाहने येजा करू शकत नाहीत.गावात एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या,तर त्यांना डोली किंवा कपड्याची झोळी करून तालुक्याच्या ठिकाणी आणावे लागते.लाखो कोटी रु.ची जी उधळपट्टी या तीन इंजिन सरकारने चालवली आहे,ती राज्याला आर्थिक खाईत ढकलणारी आहे.पण रयतेचे ऐकतो कोण ? मालकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या या नेत्यांना लोक आगामी विधानसभा निवडणुकीत चांगलाच हिसका दाखवतील,कारण अनेक महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष न देता हे तीन इंजिनचे सरकार सध्या पार भरकटत चालले आहे.ते पुन्हा सत्तेच्या रुळावर येण्याची शक्यता फार कमी आहे.

