दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एक तर तू असशील नाही तर मी,
बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले,
उद्धव ठाकरे यांचा तळतळाट,
- उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस,या दोघामध्ये सुरू झालेले वाकयुद्ध आता चांगलेच हातघाईवर आले आहे.उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एकेरीवर येत,” एक तर तू असशील किंवा मी असेन,” व बुटचाट्याने आईच्या कुशीवर वार केले,असे जाहीर वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस,अमोल मिटकरी-
देशपांडे,विद्या चव्हाण-चित्रा वाघ,असा कलगीतुरा रंगू लागला आहे.आपण व आपल्या मुलाला तुरुंगात पाठवण्यासाठी फडणवीस यांनी कटकारस्थाने केल्याचे उघड झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा संयम सुटला व त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.अमोल मिटकरी यांनी तर थेट मनसे ही वसुली गॅंग असून माझ्यावर टीका करण्याची त्यांची औकात नाही,अशी विखारी टीका केली.राजकीय टीकेची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे.आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या जनतेला खूप काही सोसावे लागणार आहे.एकमेकांच्या उणीदूणी काढणे,लफडी/भानगडी चव्हाट्यावर आणणे,तपास यंत्रणांचा ससेमिरा लावणे,अशाप्रकारांना उत येणार आहे.उद्धव ठाकरे यांच्या टिकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची बोलघेवडी टोळी सक्रिय झाली आहे. आ.प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना,देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी एक हजार वेळा जन्म घ्यावा लागेल,असे म्हंटले आहे.तर प्रसाद लाड,चंद्रशेखर बावनकुळे,आशिष शेलार,हे आता सारवासारव करण्यासाठी सरसावले आहेत.हे प्रकरण नेमके काय आहे,ज्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अशाप्रकारचा संताप व्यक्त केला.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ” मी गृहमंत्री असताना फडणवीस यांनी एका इसमाला चार प्रतिज्ञापत्रे घेऊन माझ्याकडे पाठवले होते.त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे,अनिल परब व अजित पवार या चौघांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.पण मी त्यास नकार दिल्यामुळे माझ्यावर १०० कोटीच्या वसुलीचा खोटा गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्यात आले.मला सर्वोच्च न्यायालय व न्या.चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीने माझी निर्दोष सुटका केली.पण राज्यसरकारने त्यांचा अहवाल सार्वजनिक न करता तो दाबून ठेवला आहे.” स्पष्ट केले.अनिल देशमुख यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणानंतर सर्वत्र गदारोळ उडाला.या सर्व घडामोडीनंतर आता फडणवीस यांची फौज सारवासारव करण्याच्या कामाला लागली आहे.देशमुख देखील या सर्व प्रकरणी लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचे समजते.

